नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा, 01 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे बाहेर गावातून आलेल्या लोकांना वाळीत टाकण्याचे प्रकार समोर आले आहे, वर्धा जिल्ह्यातील जाम इथं कोरोनाच्या संशयावरून एका व्यक्तीचा मृतदेह तब्बल 3 तास घरातच पडून होता. अखेर कोरोनासदृश्य लक्षणे असल्याचे सांगत त्याचा मृतदेह न स्वीकारल्याने प्रशासनाच्या वतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेह ठेवण्याकरिता व्यवस्थित शवविच्छेदन गृह आणि शितपेटी नसल्याने मृतदेह हिंगणघाटला पाठविल्या जाते. ३० जून रोजी जाम येथील बंडू गुलाब बागेश्वर (वय ४७) यांचा मृत्यू झाला. त्यास दहा दिवसांपासून सर्दी, खोकला व ताप असल्याने तो घरीच होता.
नितीन गडकरींनी आखली मोठी योजना, देशभरातील प्रत्येक नागरिकाचा होईल फायदा!
चालक असल्याने त्याचे कुठेही जाणे-येणे सुरू होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास वृद्ध आईला त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले. आईने त्याला लिंबूपाणी दिले. मात्र, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याला कोरोना सदृश्य लक्षणे असल्याने कोरोना चाचणीकरिता स्वॅब घेऊन तीन दिवस अहवाल येईपर्यंत मृतदेह शितपेटीत ठेवायचा होता. याबाबत जाम येथील सरपंच सचिन गावडे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील भगत यांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावली.
मात्र, पीपीई किट नसल्याने त्याला रुग्णवाहिकेत टाकायचे कुणी, असा प्रश्न निर्माण झाला होता. रुग्णालयाचा किंवा आरोग्य
विभागाच्या कर्मचारी मृतदेहाला हात लावत नसल्याने नागरिकां समोर अडचण निर्माण झाली. त्यानंतर समुद्रपूरच्या रुग्णालयातील पीपीई किट घातलेल्या कर्मचाऱ्यानी मृतदेह उचलला.
दरम्यान, समुद्रपूर की हिंगणघाटला नेण्यावरून सुद्धा दोन्ही वैद्यकीय अधीक्षकांचे एकमत झाले नाही. शल्य चिकित्सकांच्या सूचनेवरून समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून त्याचा स्वॅब घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. सदर व्यक्ती ही गावकऱ्यांना कोरोना संशयित वाटत असल्याने व मृतकाची म्हातारी आई असल्याने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.
कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या मंत्र्याने मुंबई पोलिसांच्या ‘या’ निर्णयावर टीका
प्रभारी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी निर्णय घेत प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महेंद्र सूर्यवंशी, ठाणेदार हेमंत चांदेवार, पोलीस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील भगत,
पोलीस पाटील कवडू सोमलकर, सरपंच सचिन गावंडे, ग्रामसेवक धोटे, तलाठी उपस्थित होते.
संपादन- सचिन साळवे