मुंबई, 26 ऑक्टोबर: राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aditya Thackeray)यांना 'बेबी पेन्ग्विन' म्हणणारा समित ठक्कर (Samit Thakkar)याला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई आणि नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी समित ठक्कर हा नागपूरचा रहिवासी असून त्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav Thackeray) यांच्याबद्दलबी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
समित ठक्कर याला रविवारी पोलिसांनी राजकोट येथे अटक केली. आरोपीला आज (सोमवारी) नागपूर कोर्टात हजर करण्यात येणार आहेत. समित यानं ट्वीट करून आदित्य ठाकरे यांना 'बेबी पेन्ग्विन' म्हणून खोचक टीका केली होती.
हेही वाचा... कोरोनाच्या लशीबाबात केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, देशाला मिळणार मोफत लस
अमृता फडणवीसांनी केली होती पाठराखण...
आरोपी समित ठक्करचे ट्विटरवर हजारो फॉलोअर्स आहेत. त्याची फॉलोअर्सची संख्या 60 हजारांच्या घरात आहे. तर भाजपचे अनेक मात्तबर नेते सुद्धा समित ठक्करला ट्विटरवर फॉलो करतात. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील समावेश आहे. एवढंच नाही तर समित ठक्कर याचं नाव समोर आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी देखील त्याची पाठराखण केली होती.
दरम्यान, युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समित ठक्कर याच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. आरोपी समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा धर्मेंद्र मिश्रा यांनी केला आहे.
धर्मेंद्र मिश्रा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर 1 ऑक्टोबर 2020 रोजी हायकोर्टाने समित याला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर समित 5 ऑक्टोबर रोजी व्ही. पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर दाखल झाला. मात्र, काही वेळातच तो बाथरुमला जातो, असं त्यानं तिथून पळ काढला होता.
सायबर सेलकडूनही तक्रार दाखल..
सायबर पोलिसांनी समित याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कोर्टाने सुरुवातीला समित ठक्कर याला त्याचा लॅपटॉप, मोबाईल पोलिसांसमोर सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याने कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही. ही बाब कोर्टाच्या लक्षात आणून दिल्यावर कोर्टाने पुन्हा आरोपी समित याला वी. पी. रोड पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशन येथे जाऊन तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा...हा तर पोलार्डचा भाऊ! आर्चरनं घेतला जबरदस्त कॅच, मैदानावरील सर्व खेळाडू शॉक
समित याला हे आदेश 16 ऑक्टोबर रोजी दिले. मात्र, त्याने हा गुन्हा रद्द करावा म्हणून नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर वारंवार आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या समित ठक्कर याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.