मुंबई 9 जुलै: सैराट (Sairat) सिनेमात सगळ्यांनी रिंकूला (Rinku Rajguru) एका डॅशिंग अवतारात पाहिलं होतं. रिंकूने पहिल्याच भूमिकेत आर्चीच्या (Rinku Rajguru in Sairat) पात्रातून अक्षरशः एका रात्रीत स्वतःची ओळख बनवली. रिंकूला या भूमिकेनंतर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. अशाच एक भन्नाट प्रश्न तिला एका प्रोमोमध्ये विचारल्याचं पाहायला मिळत आहे. झी मराठीवर एका नव्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. ‘बस बाई बस’ (Bas Bai Bas new show) असं या कार्यक्रमाचं नाव असून सुबोध भावे खास महिलांसाठी राखीव बस घेऊन येताना दिसणार आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप खूपच निराळं असणार आहे. एका खास बसमध्ये महिलांना भेटायला त्यांच्या आवडीच्या स्त्री अभिनेत्री त्यांना भेटायला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) आणि रिंकू राजगुरू दोघी दिसून आल्या होत्या. या प्रोमोमध्ये अनेक महिला रिंकू आणि अलका यांना भन्नाट प्रश्न विचारून भंडावून सोडताना दिसत आहेत. अनेकदा एखादं पात्र साकारल्यानंतर सामान्य प्रेक्षकांना कलाकारांबद्दल बरेच प्रश्न पडताना दिसतात. असेच काही भन्नाट प्रश्न या महिला दोन्ही अभिनेत्रींना विचारताना दिसत आहेत. त्यातच एक महिला रिंकूला विचारते, ‘तू कधी कोणाला खरोखर कानाखाली मारलं आहेस का?’ तर एकजण तिला ‘तुला पुरणपोळी बनवता येते का’ असं विचारते. या सगळ्या प्रश्नांवर मात्र उत्तरं देताना दोघींच्याही नाकी नऊ येताना दिसत आहेत. हे ही वाचा- Kushal Badrike: कुशल करतोय अप्सरेसोबत रोमान्स, ‘या’ अभिनेत्रीसोबत डान्स करायची इच्छा झाली पूर्ण “रिंकूचा सैराट मधला अवतार बघून अनेकांना तिच्या खऱ्या आयुष्यातल्या स्वभावाबद्दल खूप प्रश्न असतात. या प्रोमोमध्ये असेच काही प्रश्न विचारताना महिला दिसत आहेत. झी मराठीवरील खास महिलांसाठी असलेला हा कार्यक्रम एक वेगळाच विषय घेऊन समोर येत आहे. या कार्यक्रमात लेडीज स्पेशल बस मध्ये मराठीतील काही आघडीच्या अभिनेत्रींना भेटायची, मनसोक्त गप्पा मारायची संधी प्रेक्षकांतील महिलांना मिळणार आहे असं प्रोमोमधून सांगितलं जात आहे.
सध्याच्या ट्रॅव्हल शोच्या संकल्पनांमध्ये या वेगळ्या कार्यक्रमाची भर पडताना दिसत आहे. रिंकू आणि अलका यांचा हा प्रोमो फारच लक्षवेधी ठरताना दिसत आहे.