पुणे, 27 जुलै : आज पुण्यात महाराष्ट्र निर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातल्या भाषणावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आताचे सगळे मुख्यमंत्री हे बसवलेले आहेत अशा शब्दात त्यांनी मराठा आरक्षणावर तुफान टोलेबाजी केली आहे. सध्या मराठा आरक्षणाने अवघा महाराष्ट्र राज्य पेटून उठला आहे. त्यावरही राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. आरक्षणाबाबत सरकार तुमच्या भावनांशी खेळत आहे, स्थानिक मुलांना नोकऱ्या मिळाल्या तर आरक्षणाची गरज नाही असं म्हणत राज ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणावर राज ठाकरे म्हणाले…. कोणत्याही इतर राज्यापेक्षा आतापर्यंत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे आधी मराठी मुलांना नोकऱ्या मिळू द्या. आम्हाला जातनिहाय आरक्षण नको आहे. आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिलं पाहिजे. स्थानिकांना जर इथे विविध संस्थांमध्ये 80 टक्के नोकऱ्या मिळत असतील तर आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी समाजात जातीचे विष कालवलं आहे. सरकार खाजगी संस्थांना प्रोत्साहन देतंय आणि सरकारी संस्था बंद पाडतंय. मग आरक्षण देणार कोण आणि त्याचा उपयोग तरी काय असा सवालही राज यांनी विचारला आहे. सरकारी नोकऱ्या जर कमी होत चालल्या आहेत तर मग खासगी नोकऱ्या जातायत कुठं असंही राज म्हणाले आहेत. या आरक्षणाच्या नादाच काकासाहेब शिंदे यांचा हाकनाक बळी गेला, हे सरकार फक्त तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व पक्ष फक्त मतांसाठी तुम्हाला खेळवत आहेत, अशा शब्दात राज यांनी भाजपवर तोफ डागली आहे. सत्ताधारी भाजपवर टीका… आधीच नोटबंदी करून सरकारने मोठा राजकीय खड्डा खोदला आहे. सरकारला लोकांशी काही देणंघेणं नाही. गेल्या चार वर्षात चंद्रकांत पाटील यांनी काय केलं अशा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी पाटलांवर टीका केली आहे. तर आताचे सगळे मंत्री हे बसवलेले आहेत. या सगळ्यातून बाहेर पडून महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याची गरज आहे. भाजप महाराष्ट्राचा बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड करणार आहे का ? पंतप्रधान हा देशाचा असावा राज्याच्या असता कामा नये, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठी भाषेची सक्ती हवी…. महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी हा मुद्दा पुन्हा एकदा या मेळाव्यात उचलून धरला. अहमदाबादच्या सर्व शाळांमध्ये गुजराती भाषा ही सक्तीची आहे. मग महाराष्ट्रात मराठी पहिलापासून अनिवार्य का केली नाही, मराठीच्या प्रश्नांसाठी खासदारांना कोर्टात का जावं लागतं असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राहुल गांधी आणि पंतप्रधानांच्या आलिंगणावर राज यांची मोदींवर टीका… पंतप्रधान नरेंद्र मोदी देश आणि विदेशातल्या इतक्या लोकांना मिठ्या मारतात मग राहुलच्या मिठी मारल्याने काय फरक पडतो. आपला पंतप्रधान हा आपल्या देशाचा असावा तो कोणा एका राज्याचा नसावा अशा शब्दात राज ठाकरे यांनी पंतप्रधानांवर निशानेबाजी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







