राधाकृष्ण विखेंनी 'हात' सोडला, आता कोणता झेंडा 'हाती'?

राधाकृष्ण विखेंनी 'हात' सोडला, आता कोणता झेंडा 'हाती'?

मुलाला पक्षाने जागा मिळवून दिली नाही म्हणून पक्षावर नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना अखेर काँग्रेसने पक्षाने विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त केलं आहे.

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

अहमदनगर, 25 एप्रिल : 'मुलाला पक्षाने जागा मिळवून दिली नाही म्हणून पक्षावर नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना अखेर काँग्रेसने पक्षाने विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे विखे आता 27 तारखेला काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अहमदनगरचे मतदान पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे. गावी गावी ते समर्थकांच्या बैठका घेत आहेत. विखे पाटील हाच आमचा पक्ष असून ते जो आदेश देतील त्यानुसार काम करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

विखेंच्या गोटातील भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आणि बाळासाहेब थोरात यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी विखे विरोधकांची मोट बांधली. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे थोरात यांची भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे.

विखेंची शिर्डीकडे कूच

सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात कोणत्याही काँग्रेसच्या सभेला हजेरी लावली नाही. राधाकृष्ण विखे दक्षिण नगरमध्ये मुलाच्या विजयासाठी मोट बांधत होते. आता नगरच्या मतदानानंतर सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत.

विखेंना मानणारे सर्व कार्यकर्ते आजपर्यंत कोणाच्याही प्रचारापासून अलिप्त आहेत. ज्या काँग्रेस पक्षाने आमच्यावर अन्याय केला त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही अशी स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी श्रीरामपूर येथे समर्थकांचा मेळावा घेतला यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावरच टीका केली होती. 'जो पक्ष मला न्याय देवू शकला नाही त्याचा प्रचार का करावा' असं विखे पाटील म्हणाले होते.

27 तारखेला मांडणार भूमिका

आज विखे पाटील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार होते. मात्र मी येत्या 27 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा राजीनामा स्वीकारला आहे.

आता विखे विरुद्ध थोरात सामना

नगरची लढाई विखे विरूद्ध पवार अशी रंगली होती तर आता शिर्डीची लढाई विखे विरूद्ध थोरात अशी रंगणार आहे. विखे समर्थक असलेल्या करण ससाणे यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. उद्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा संगमनेर येथे होते आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या श्रीरामपूर येथे सभा घेत आहेत. विखे आणि थोरात यांच्यात शह कटशहाच्या राजकारणात आता कोणाचा विजय होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

=======================

First published: April 25, 2019, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading