पुण्यात पुन्हा लॉकडाऊन! अजित पवारांच्या आदेशाला व्यापारी संघाचा विरोध

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन! अजित पवारांच्या आदेशाला व्यापारी संघाचा विरोध

अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे (Pune) शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpari Chinchwad) पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे.

  • Share this:

पुणे, 10 जुलै: पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे (Pune) शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpari Chinchwad) पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. 13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. या संदर्भात अजित पवार यांनी अधिकाऱ्यासोबत बैठकीत चर्चा केली.

हेही वाचा...मोठा निर्णय! मुंबईला लागून असलेल्या या महानगरात पुन्हा वाढवला लॉकडाऊन

दुसरीकडे, पुणे शहर व्यापारी संघाचा लॉकडाऊनला विरोध केला आहे. पुणे शहरात परत लॉकडाऊन झाला तर उद्रेक होईल, असंही व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद्र राका यांनी म्हटलं आहे. सातही दिवस दुकाने उघडी ठेवावीत. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 अशी वेळ असावी, अशा मागण्या व्यापारी संघानं केल्या आहेत. व्यापारी संघात सुमारे 40 हजार दुकानदार सदस्य आहेत. आता व्यापारी संघाच्या विरोधानंतर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणी महत्त्वाचं ठरणार आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालला आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यात बुधवारी 1618 कोरोना रुग्ण वाढले होते तर गुरुवारी ही संख्या वाढून 1803 वर पोहोचली. यामध्ये पुणे शहर 1032, पिंपरी चिंचवड 573, पुणे ग्रामीण 137 अशी रुग्णांची संख्या आहे. परिणामी, पुणे शहरात अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. 13 जुलै म्हणजे सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यामध्ये दूध,औषध यांचा समावेश आहे. ज्या वस्तू लागत आहेत, त्या खरेदी करुन घ्या,' असं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडून करण्यात आलं आहे.

पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल.

पिंपरी चिंचवडमध्येही वेगाने वाढ

पुणे सरासरी वाढ तेवढीच राहिल्याचं दिसत आहे, मात्र पिंपरी चिंचवड रुग्णांची संख्या तीनशेवरून पाचशेवर गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सरासरी वाढ पन्नासवरून दीडशेच्या जवळपास पोहोचली आहे, म्हणूनच शहरालगतची 20 गावं पुन्हा सीलबंद केली आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या 34399 तर पुणे शहरातील 25 हजारांवर गेली आहे.

दरम्यान, कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने शहरालगत हिंजवडी आणि मारुंजी परिसरात कालपासूनच 8 दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत.9 जुलै ते 16 जुलै दरम्यान केवळ दूध,मेडिकल आणि दवाखाने सुरू असतील. तसंच या भागातील आयटी कंपन्यांना मात्र सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा...Vikas Dubey Encounter: वडील म्हणाले, बरं झालं मारलं, अंत्यविधीलाही नाही जाणार

दुसरीकडे, हवेली तालुक्यातील नांदेड गाव, खडकवासला, किरकीटवाडी ,नऱ्हे,मांजरी, पिसोळी, वाघोली, न्यू कोपरे,खानापूर,गुजर निंबाळकरवाडी,वडाची वाडी, लोणी काळभोर,भिलारे वाडी ,उरुळी कांचन, शेवाळेवाडी, भिलारे वाडी कदमाक वस्ती,कुंजीर वाडी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: July 10, 2020, 6:41 PM IST

ताज्या बातम्या