...तर लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल, 'बाबरी मशीद विध्वंस'वर आंबेडकरांच परखड मत

...तर लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल, 'बाबरी मशीद विध्वंस'वर आंबेडकरांच परखड मत

धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे.

  • Share this:

पाटणा, 30 सप्टेंबर: बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षडयंत्र नव्हतं, त्यामुळे विशेष सीबीआय न्यायालयानं 32 आरोपींची बुधवारी निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल, असं परखड मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा...Babri Demolition Case: बाबरी मशीद विध्वंस हा कट नव्हता यावर विश्वास ठेवणं कठीण- माधव गोडबोले

अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणावर बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यात प्रामुख्याने लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 32 लोकांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप होता. दरम्यान आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आलं. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही. लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाईल, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे. तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

दरम्यान, 6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

हे होते बाबरी मशीद प्रकरणातील 32 आरोपी

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुरसिंग, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रजभूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडे, अमर नाथ गोयल, जयभानसिंग पवईया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला , आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीरकुमार कक्कर आणि धर्मेंद्रसिंग गुर्जर.

या 17 आरोपींचे झाले आहे निधन

सीबीआयने जाहीर केलेल्या 49 आरोपींपैकी 17 जणांचे निधन झाले आहे. यात अशोक सिंघल, गिरीराज किशोर, विष्णू हरी डालमिया, मोरेश्वर सवाईन, महंत अविद्यानाथ, महामंडलेश्वर जगदीश मुनि महाराज, बैकुंठ लाल शर्मा, परमहंस रामचंद्र दास, डॉ सतीश. नगर, बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन एसएसपी डीबी राय, रमेश प्रताप सिंह, महात्यागी हरगोविंद सिंह, लक्ष्मी नारायण दास, राम नारायण दास आणि विनोद कुमार बन्सल यांचे निधन झाले आहे.

हेही वाचा...'जय श्रीराम' असा जयघोष करत लालकृष्ण आडवाणी यांनी केलं निकालाचं स्वागत

6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं?

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत. देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी 'जय श्री राम'चा नारा होता.अयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: September 30, 2020, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading