मुंबई, 1 एप्रिल : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताची (Team India) दखल घेण्यास 1971 सालापासून सुरुवात झाली. त्याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजमध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली. भारतीय टीमनं त्यानंतर पुढे इंग्लंडमध्ये देखील कसोटी मालिका जिंकत नवा इतिहास रचला. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये मालिका जिंकून नवा इतिहास घडवणाऱ्या भारतीय टीमचे कॅप्टन अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांचा आज जन्मदिवस. आजच्याच दिवशी म्हणजे 1 एप्रिल 1941 रोजी वाडेकर यांचा जन्म झाला होता.
अजित वाडेकर क्रिकेटमध्ये आले तेव्हा मुंबई क्रिकेटचा मोठा दबदबा होता. त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 1958 साली पदार्पण केलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतरही राष्ट्रीय टीममध्ये निवड होण्यासाठी त्यांना 1966 सालापर्यंत वाट पाहावी लागली.
भारतीय टीममध्ये पदार्पण केल्यानंतर थोड्याच दिवसात ते नंबर तीनचे विश्वासू बॅट्समन बनले. त्याचबरोबर स्लीपमधील उत्तम फिल्डर म्हणून देखील त्यांची ओळख होती. 1968 साली झालेला न्यूझीलंड दौरा वाडेकर यांनी गाजवला. त्या दौऱ्यात भारताने पहिल्यांदात विदेशातमध्ये टेस्ट मॅच जिंकली होती. भारताच्या त्या पहिल्या विजयात वाडेकर यांचं मोलाचं योगदान होतं. न्यूझीलंड दौऱ्यात वेलिंग्टनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमधील एकमेव शतक झळकावलं. न्यूझीलंडच्या त्या दौऱ्यात वाडेकर यांनी 318 रन काढले.
वाडेकर यांनी एकच शतक झळकावलं असलं, तरी टीमला गरज असेल तसा खेळ खेळण्यासठी ते प्रसिद्ध होते. त्यामुळेच त्यांच्याकडे लवकरच ते भारतीय टीमचे कॅप्टन बनले. 1971 साली त्यांच्याच नेतृत्वाखाली झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी पदार्पण केलं. सुनील गावसकर यांची शानदार कामगिरी आणि त्याला मिळालेली वाडेकर यांच्या कॅप्टनसीची साथ याच्या जोरावर भारतामध्ये वेस्ट इंडिजमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.
वेस्ट इंडिजनंतर इंग्लंडमध्येही वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी मालिका जिंकली. भारतीय स्पिनर्सचा उत्तम वापर त्यांनी या दौऱ्यात केला. इंग्लंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर काही वर्ष भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा होता.
1974 साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. याच मालिकेत लॉर्ड्सवर भारतीय टीम 42 रनवर आऊट झाली. या मानहानीकार कामगिरीनंतर वाडेकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
निवृत्तीनंतरही त्यांनी भारतीय टीमचे प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी केली. मोहम्मद अझहरुद्दीन सोबत 1990 च्या दशकात त्यांची पार्टरनरशिप चांगलीच गाजली. प्रशिक्षक पद सोडल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. कॅप्टन, प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा तीनही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये वाडेकर यांचं निधन झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit wadekar, Birthday celebration, Cricket, England, On this Day, Sports, West indies