नाशिक, 02 ऑगस्ट : अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा येत्या 5 ऑगस्टला होत आहे. परंतु, या सोहळ्यावरुन भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटला आहे. 'श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही' अशी जळजळीत टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
नाशिकच्या सिडको परिसरात आज एका कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पार पडलं. विशेष म्हणजे, हे हॉस्पिटल शिवसेनेच्या पुढाकारानं तर उद्घाटन राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हातून झाले आहे. शहरात कोरोनाची परिस्थितीत पाहता शिवसेनेच्या पुढाकारातून बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उदघाटन तर केलंच आणि रामजन्मभूमी भूमिपूजन कार्यक्रमावर चांगलंच तोंडसुख घेतलं.
बाप्पा पावला, रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
'कोरोनमुक्त महाराष्ट्र घडो हीच श्रीराम चरणी प्रार्थना केली आहे. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र, माझा जन्म नाशिकचा आहे. प्रभू श्रीराम हे कुणाच्या मालकीचे नाही. श्रीरामाचा सातबारा कोणाच्या खाजगी नावावर नाही, असं म्हणत आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली.
तसंच, 'रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती वेगळी असते. गेली 40 वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केलं, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. राम नाव घेऊन त्यांनी पाणी विकलं, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केलं', असा थेट आरोपही आव्हाडांनी केला.
शिवसेनेसाठी राममंदिर हा अस्मितेचा मुद्दा - एकनाथ शिंदे
दरम्यान दुसरीकडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शिवसेनेसाठी राममंदिर हा राजकारणाचा नव्हे तर श्रद्धा, अस्मिता आणि भक्तीचा विषय आहे' असं म्हणत भाजपवर पलटवार केला आहे.
तसंच, जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही अयोध्येला गेले होते, त्यामुळे हा श्रद्धेचा आणि भक्तीचा प्रश्न आहे, अशी आठवण करून एकनाथ शिंदेंनी टोला लगावला.
शरद पवारांची राजेश टोपे यांच्या कुटुंबीयांबद्दल भावूक पोस्ट
तसंच, राज्यावर कोरोनाचे संकट बिकट आहे. अशा परिस्थितीत राजकारण करण्याची वेळ नाही. भाजपकडून 'ऑपरेशन लोटस'ची हवा केली जात आहे, पण महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकार कोसळणार नाही आणि अशी शक्यताही नाही, असं एकनाथ शिंदेंनी ठणकावून सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.