#Mumbai26/11 : ...आणि ती एक गोळी मला आयुष्यभरासाठी ​वेदनादायी ठरली!

#Mumbai26/11 : ...आणि ती एक गोळी मला आयुष्यभरासाठी ​वेदनादायी ठरली!

मुंबईच्या इतिहासात रक्तानं लिहिलेल्या 26/11 या तारखेला सोमवारी 10 वर्षं पूर्ण होताहेत. या घटनेचे साक्षीदार अजूनही त्याच्या खोल जखमा घेऊन जगताहेत. शरिराच्या जखमा एक वेळ १० वर्षांत भरून येतील, पण मानसिक व्रण मात्र आयुष्यभर कायम असतात. डोंबिवलीत राहणाऱ्या पारसनाथ गिरी यांनी त्यांची भळभळती जखम न्यूज18 लोकमकबरोबर शेअर केली.

  • Share this:

मुंबई, २4 नोव्हेंबर : मुंबईच्या इतिहासात रक्तानं लिहिलेल्या 26/11 या तारखेला सोमवारी 10 वर्षं पूर्ण होताहेत. या घटनेचे साक्षीदार अजूनही त्याच्या खोल जखमा घेऊन जगताहेत. शरिराच्या जखमा एक वेळ १० वर्षांत भरून येतील, पण मानसिक व्रण मात्र आयुष्यभर कायम असतात. डोंबिवलीत राहणाऱ्या पारसनाथ गिरी यांनी त्यांची भळभळती जखम न्यूज18 लोकमकबरोबर शेअर केली. दहशतवाद्याची गोळी त्यांच्या शरिरातून आरपार गेली मात्र... "ती एक गोळी आयुष्यभरासाठी माझ्यासाठी वेदनादायी ठरतेय... अजूनही काळीज पोखरतेय...", पारसनाथ सांगतात.

आता निवृत्तीचं आयुष्य जगणारे पारसनाथ त्या वेळी हेड कॉन्स्टेबल म्हणून(RPF) कार्यरत होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईच्या सीएसटी स्थानकावरच ते तैनात होते.

आजही तो दिवस आठवला की पारसनाथ गिरी थरथरतात. त्यांचा स्वर कातर होतो. "26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत माझी ड्युटी सीएसटी स्थानकावरच लागलेली होती. स्टेशनच्या कॉरिडॉरमधील मोठ्या घड्याळाजवळच मी गस्तीवर होतो. रात्रीचे 9 वाजलेले होते. चाकरमान्याची गर्दी ओसरली असली तरी, सीएसटीवरून परगावी जाणाऱ्यांची मात्र चांगलीच गर्दी होती. गाड्यांना विलंब असल्यामुळे काही प्रवासी मिळेल त्या जागेवर त्यांच्या सामानासकट ठाण मांडून बसले होते. सर्व काही रोजच्यासारखं सुरळीच चाललं होतं."

"अचानक ९.३०च्या सुमारास छोट्या स्फोटांसारखे... फटाके फुटतात तसे आवाज सुरू झाले. क्रिकेट मॅच होती त्या दिवशी. त्यामुळे वाटलं भारत जिंकल्याचा आनंदात कुणी फटाके फोडून साजरा करत असेल. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं...."

नेमकं काय होतंय, ते कळायच्या आत बेछूट गोळीबार सुरू झाला होता. "मी गस्तीवर असल्यामुळे काही लोकं माझ्या कडे धावत आले आणि त्यांनी जे सांगितलं ते अंगावर शहारे आणणार होतं. स्टेशनच्या प्रवेशद्वारातून दोन बंदुकधारी तरुणांनी कॉरिडॉरमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. जो-तो आपला जीव मुठीत धरून सैरावैर पळू लागला. सर्वत्र एकच आक्रोश सुरू होता. त्या हल्ल्यातून वाचण्यासाठी प्रत्येक जण जिवाच्या आकांताने धावत सुटला होता. आक्रोश, किंचाळ्या आणि गोळीबाराचा आवाज भयंकर होतं सगळं...''

किंकाळ्या, चेंगराचेंगरी आणि ठायठाय

चेंगराचेंगरी आणि गोळीबार सुरू असताना जीव वाचवण्यासाठी अक्षरशः खाली पडलेल्यांना तुडवून लोक वाट काढत होते. धावता येणं अशक्य असल्याने या चेंगराचेंगरीत महिला-लहान मुलं आणि वृद्ध लोकं अक्षरशः तुडविल्याचं दृष्य अंगावर शहारे आणणारं होतं...." त्या घटनेच्या विदारक आठवणी सांगताना अवघं आयुष्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी खर्ची घालणाऱ्या परासनाथ यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं.

"त्या घटनेनंतर सुरक्षेसाठी प्रत्येक अरपीएफ जवानाला आता बंदुका देण्यात आल्या आहेत. पण, त्या क्षणी माझ्याजवळ एका दंडुक्याशिवाय काहीच नव्हतं. जर त्या वेळी माझ्याजवळ एखादी बंदूक असती, तर मी तेव्हाच त्या दोघांचा खात्मा केला असता'', असं पारसनाथ सांगतात

त्या रात्रीचा प्रसंग आणि ती चलबिचल पारसनाथ यांना अजूनही आठवते.

''आपला जीव वाचवावा, की लोकांचा वाचवावं अशी जीवाची घालमेल सुरू होती. डोळ्यासमोर मुलं दिसायला लागली. पण वेळीच स्वतःला सावरलं. मी असे हातपाय गाळले तर आणखी रक्ताचा सडा पडेल या जाणीवेनं मी लोकांना स्थानकाबाहेर पडण्यासाठी सांगत होतो.

मी सैरभैर पळणाऱ्यांना स्थानकाबाहेर पिटाळायला सुरुवात केली. माझ्या हातात कोणतंच शस्त्र नसल्यामुळे मला हा एकच पर्याय योग्य वाटला. जान बचानी है तो, स्टेशनसे बाहर निकलो... बाहर भागो... असं मी जिवाच्या आकांतानं ओरडत होतो. जवळपास अडीचशेहून आधीक लोकांना मी अक्षरशः स्थानकाबाहेर पिटाळलं. या कामात त्या वेळेस माझासोबत ड्युटीवर असलेला माझा साथीदार एस. एम. चौधरी याची फार मदत झाली.''

ती एक गोळी....

"कधी हवेत फैरी झाडल्या जात होत्या, तर कधी पळणाऱ्या नागरिकांवर. माझ्या दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. लोकांना स्थानकाबाहेर पिटाळत असताना एक गोळी माझ्या शरिरातून आरपार गेली आणि थेट माझ्या मागे उभ्या असलेला माझा सहकारी चौधरीच्या डोक्यात लागली. मला गोळी लागली आहे हे मला तेव्हा कळलं, जेव्हा चौधरी जोरात ओरडला आणि मी त्याला कवेत घेण्यासाठी त्याचाजवळ धावलो. चौधरीला जवळ घेत असतानाच आरपार गोळी गेल्यानं माझाही शर्ट रक्तानं माखला असल्याचं लक्षात आलं. चौधरी जागेवरच गेला होता.''

पारसनाथ अतिशय भावुक झाले होते. ''धडाधड गोळीबार सुरू असताना मी अनेकांना वाचवू शकलो. मला माझं जीवन सार्थकी लागलं असं वाटतं. पण, त्याच एका गोळीनं माझ्या साथीदाराचा जीव घेतला होता. ती एक गोळी माला आयुष्यभरासाठी वेदनादायी ठरली. कसाबनं झाडलेली गोळी जर माझ्या शरिरातून आरपार गेली नसती, तर कदाचित चौधरी वाचला असता. ही खंत मला आयुष्यभर जाणवत राहील'', हे सांगत असताना त्यांना आपले आश्रू आवरता आले नाही.

मीडियाला सगळं सांगणं पडलं महागात

'गोळी लागल्यानंतर पारसनाथ यांना भायखळ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. "मला गोळी लागल्याची माहिती काही कळाच अनेक माध्यम प्रतिनिधींनी घटनेची चौकशी केली. 26/11 ला सीएसटीवर काय घडलं हे मी त्यांना सांगितलं खरं, पण कोणत्याही अधिकाऱ्याला न विचारता मिडीयाला माहिती देणं मला महागात पडलं. कारण मी आरपीएफच्या कायद्याचं उल्लंघन केलं होतं. या कारणामुळे मला 7 महिने निलंबित करण्यात आलं होतं. पण, त्यानंतर मला परत नोकरीवर जॉईन करुन घेण्यात आलं. आणि त्यानंतर तीन वर्षं मी नोकरी केली आणि निवृत्त झालो."

आणि त्यानंतर...

26/11ला सीएसटी स्थानकावर सीएसटीला अंदाधुंद गोळीबार करणारे इस्माईल खान आणि अजमल कसाब होते. एके-47 राइफल्स त्यांच्याकडे होत्या. जवळपास सव्वा तास त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यांच्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्यांनी शेकडोंचे प्राण घेतले, तर हजोरो जखमी झाले. या सव्वा तासात प्रचंड विध्वंस करून ते दोघे बाहेर पडले आणि त्यानंतर आपल्या अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी लक्ष केलं. हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, मेजर उन्नीकृष्णंन असे अनेक अधिकारी शहीद झाले.

#Mumbai 26/11- ‘थोडं घाईत आहे… नंतर फोन करतो’ पण तो फोन कधी आलाच नाही

#Mumbai26/11 : कसाबला फासापर्यंत नेणारं Mission X 'या' महिला अधिकाऱ्यानं केलं पूर्ण

#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार!

First published: November 24, 2018, 10:39 PM IST

ताज्या बातम्या