Home /News /news /

EXCLUSIVE : बुलेट ट्रेनसाठी पालघरची जागा अधिग्रहण करण्याचं ध्येय, मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट नवं सरकार पूर्ण करणार

EXCLUSIVE : बुलेट ट्रेनसाठी पालघरची जागा अधिग्रहण करण्याचं ध्येय, मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट नवं सरकार पूर्ण करणार

राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस हे नवं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी प्रयत्नांची पराकष्ठा करणार आहे.

    तुषार रुपणवर, प्रतिनिधी मुंबई, 3 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हं आहेत. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस हे नवं सरकार बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी पालघर (Palghar) जिल्ह्यात राहिलेलं जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा फास्टट्रॅकवर येणार आहे. तसेच राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही उचलला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण या प्रकल्पाला जमीन अधिग्रहणाचा सर्वात मोठा अडथळा आहे. कारण पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा या प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध आहे. या दरम्यान काही महिन्यांपूर्वी 12 गावांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास तयारी दर्शवल्याची बातमी समोर आली होती. हा प्रकल्प वादात सापडण्यामागील आणखी एक कारण म्हणजे या प्रकल्पात महाराष्ट्राची भरपूर जमीन अधिग्रहण होत असताना राज्यातील फक्त चार रेल्वे स्थानकांना बुलेट ट्रेनचा थांबा देण्यात येणार आहे. तर गुजरातमधील आठ रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात येणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (सातारा पोलिसांची वारीत सेवा, वारकऱ्याच्या वेषात पकडले वारीतील 44 चोरटे) बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातून 298 हेक्टर जमिनीचं अधिग्रहण केलं जाणार आहे. पण जमीन अधिग्रहणाला पालघरमधील शेतकऱ्यांचा विरोध समोर येत होता. या विरोधाचा विचार करता ठाकरे सरकारने देखील या प्रकल्पाकडे लक्ष दिलं नव्हतं. ठाकरे सरकार अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पापेक्षा मुंबई-नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही होतं. याच मुद्द्यावरुन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद-मुंबई हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर आधी करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर मार्गांचा विचार केला जाईल, असं विधान केलं होतं. विशेष म्हणजे या बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मतभेद होते. त्यामुळे महाराष्ट्रात या प्रकल्पाला फारशी गती मिळाली नाही. पण राज्यात आता पुन्हा भाजपचं सरकार आल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी गुजरातमधून एकूण 954 हेक्टर आणि दादरा-नगर हवेलीतून 8 हेक्टर जागेचं अधिग्रहण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये या प्रकल्पाचं जोरदार काम सुरु आहे. खरंतर केंद्र सरकारचं 2023 मध्ये हे प्रकल्प पूर्ण करण्याचं ध्येय होतं. पण त्यानंतर जमीन अधिग्रहण येत असलेल्या अडचणींमुळे या प्रकल्पाची पूर्ण करण्याची डेडलाईन तीन वर्ष पुढे सरकवण्यात आली. आता आगामी काळात बुलेट ट्रेनचं काम फास्टट्रॅकवर करण्याचं ध्येय सरकारचं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Bullet train, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Narendra modi

    पुढील बातम्या