मुंबई, 2 डिसेंबर : युपीए (UPA) अस्तित्वात आहे का? असा सवाल करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना राज्यातील काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर काँग्रेसच्या (Congress) गोटात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांच्या टीकेला उत्तर दिलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तर थेट आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ममता बॅनर्जी या युपीएमध्ये नाहीत. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असं प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अहंकार व्यक्तीला हरवतो, असं नाना पटोले ममता यांना उद्देशून म्हणाले आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. युपीए अस्तित्वात आहे का? असा थेट सवाल ममता यांनी केला होता. त्यामुळे मोदी सरकारविरोधात तयार होणाऱ्या देशातील तिसऱ्या आघाडीत काँग्रेस असणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आता हलाचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जवळपास तासभर खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीनंतक काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी ममता बॅनर्जींच्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा : पराग अग्रवाल सारखे प्रतिभावंत विद्यार्थी घडवणाऱ्या IIT चा इतिहास माहितीय का?
"काँग्रेस ईडी आणि सीबीआयला घाबरली नाही. पण आज देश अडचणीत आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी रस्त्यावर लढाई लढत आहेत. कार्यकर्ते रस्त्यावर लढाई लढत आहेत. आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ममता बॅनर्जी तर युपीएमध्ये नाहीत. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अहंकार व्यक्तीला हरवतो", अशा शब्दांता नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा : 'पवारांच्या साथीने ममता दीदी काँग्रेसला बाजू ठेवून सत्तेची मोट बांधतायत': फडणवीस
"केंद्रात 2014 पासून भाजपचे सरकार आहे. त्याविरोधात कोण लढतंय हे विचारलं तर सामान्य माणुसही सांगेल. राहुल गांधी लढतायत. काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. सुरुवातीपासून काँग्रेस देशभर लढत आहे. एक तर ममता युपीएच्या सदस्या नाहीत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी युपीएच्या अध्यक्षा आहेत. युपीएच्या नेतृत्वाखालीच भाजप विरोधात लढा दिला जाऊ शकतो", अशी रोखठोक भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.