नवी मुंबई, 26 मार्च: महाराष्ट्रात Coronavirus चा धोका वाढतोच आहे. दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णांची संख्याही वाढून 125 झाली आहे. दुसरीकडे, कोरोना व्हायरस प्रकरणात नवी मुंबईतील डी.वाय.पाटील हॉस्पिटलला महापालिकेने नोटीस बजावली आहे. कोरोना बाधित महिलेच्या मृत्यूबाबत हॉस्पिटल प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी डी.वाय.पाटील हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा का दाखल करू नये, असा सवालही महापालिकेने उपस्थित केला आहे. दरम्यान, कोरोना बाधित एका महिलेचा डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता.
हेही वाचा..CoronaVirusLockdown: नियम मोडणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर पहिला गुन्हा दाखल
या प्रकरणी आता नवी मुंबई महापालिकेने डी.वाय.पाटील हॉस्पिटलविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने महिलेची कोरोना तपासणी केली नाही. कोरोना बाधित महिलेच्या मृत्यूबाबत हॉस्पिटल प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हॉस्पिटलने 30 बेडचे विलगिकरण केंद्रही उभारले नाही. त्यामुळे डी.वाय.पाटील हॉस्पिटलवर गुन्हा दाखल का करू नये, असा सवाल महापालिकेने केला आहे.
हेही वाचा..'आता फक्त 'हे' 3 पर्याय आहेत', अमोल कोल्हेंनी करून दिली गंभीर धोक्याची जाणीव
मुंबईत आणखी एक मृत्यू; दिवसभरात दुसरा बळी
मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी नवी मुंबईत एकीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या राज्यात 5 झाली आहे. सकाळी वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला.
देशभरात सर्वाधिक रुग्ण राज्यात सापडले आहेत. नागपुरात आणखी एक 42 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 125 झाला आहे. वाशीत झालेल्या मृत्यूविषयी मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्चला या महिलेचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन अहवाल हाती आला असता हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या 2 खासगी रुग्णालयात गेली होती, अशीही माहिती समोर येत आहे.
हेही वाचा..चंद्रपूरच्या मशिदीत सापडले 11 तुर्कस्तानी मौलवी, गेल्या 22 दिवसांपासून होते लपून
त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, पुण्यात गेल्या 60 तासांत एकाही नव्या रुग्णाची भर पडलेली नाही, अशी माहिती पुण्याच्या महापौरांनी दिली आहे. दुसरीकडे आज पुन्हा तीन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
नागपूरमध्ये सापडलेला 42 वर्षांचा नवा रुग्ण परदेशातून आलेला नाही. किंवा त्याचा कुठल्या परदेशातून आलेल्या व्यक्तीशी थेट संपर्क झाल्याचं लक्षात नाही. तो दिल्लीहून नागपूरमध्ये आलेला होता. त्यामुळे आता कम्युनिटी ट्रान्समिशनची भीती वाढली आहे. तत्पूर्वी ठाण्यात आणखी एक तर पनवेलमध्ये एक असे दोन नवे कोरोना रुग्ण आज सकाळपासून समोर आले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.