Home /News /maharashtra /

'आता फक्त 'हे' 3 पर्याय आहेत', अमोल कोल्हेंनी करून दिली गंभीर धोक्याची जाणीव

'आता फक्त 'हे' 3 पर्याय आहेत', अमोल कोल्हेंनी करून दिली गंभीर धोक्याची जाणीव

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंभीर धोक्याची जाणीव करून दिली आहे.

    पुणे, 26 मार्च : 'लॉकडाऊनमुळे शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होत आहे. या संदर्भात "social distancing" पाळून, कोरोनाचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घेऊन काय उपाययोजना करता येईल याचा सकारात्मक विचार शासन आणि प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे. पण त्याचवेळी नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे,' असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे. "आपत्ती व्यवस्थापनाचं" एक महत्त्वाचं तत्त्व म्हणजे कोणतं नुकसान परवडू शकतं आणि कोणतं परवडू शकत नाही, याचा त्यावेळच्या परिस्थिती नुसार विचार करावा लागतो असे सांगताना डॉ. कोल्हे यांनी वानगीदाखल एक उदाहरण दिले. ते म्हणाले की, 'हाताला किंवा पायाला झालेल्या जखमेमुळे गॅंगरीनचा धोका निर्माण झाला आणि त्यामुळे जीवाला अपाय होणार असेल तर हात किंवा पाय कापून अलग करावा लागतो. म्हणजेच हात किंवा पाय गमावण्यामुळे होणारे नुकसान हे जीव गमावण्यापेक्षा त्या परिस्थितीत स्वीकारले जाते. सध्याचा लॉकडाऊन हे त्याचेच उदाहरण म्हणता येईल.' हेही वाचा- मोदी सरकारच्या मोठ्या घोषणांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 'आज कोरोनाचा सामना करताना शासन आणि प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट हे कोरोनाचा प्रसार आणि पर्यायाने मोठ्या प्रमाणावर होऊ शकणारी जीवितहानी रोखणे आणि त्याच वेळी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणं हे आहे. मुळात सांगायचे तर, "लॉकडाऊन" या गोष्टीची ना प्रशासनाला सवय आहे, ना शासनाला आणि ना नागरिकांना. त्यामुळे सर्वांनीच एकमेकाला समजून घेणं, थोडा वेळ देणं गरजेचं आहे. यात सर्वात मोठा वाटा स्वयंशिस्तीचा आहे. आजही ती पूर्णपणे पाळली जाताना दिसत नाही,' असं म्हणत अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'आपल्यासमोर आहेत फक्त तीनच पर्याय' 'हिरोगीरी रस्त्यावर बंदी झुगारत फिरण्यात नाही तर स्वयंशिस्तीने घरी राहण्यात आहे, हे सर्वांनीच ध्यानात घेतले पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता आपल्या समोर तीनच पर्याय आहेत. एक म्हणजे, निमूटपणे प्रशासनाला सहकार्य करून घरात राहणे, दुसरा हिरोगिरी करून बाहेर हिंडून स्वतःला आणि कुटुंबाला धोक्यात घालून हॉस्पिटलमध्ये जाणे आणि तिसरा पर्याय आहे तो, भिंतीवरील फोटो फ्रेममध्ये जाण्याचा. आपण जर हुशार असलो तर आपल्याला पहिला पर्यायच निवडावा लागेल अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,' असे सांगून खासदार डॉ. कोल्हे यांनी गंभीर धोक्याची जाणीव करून दिली.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amol kolhe, Coronavirus

    पुढील बातम्या