बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव, 3 मार्च : शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून राज्यभरात ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आला आहे. मात्र, धाराशिव जिल्ह्यात शिंदे गटाचे नेते, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे एकमेकांच्या गळ्यात हात घालून उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामात पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दुजाभाव केल्याची तक्रार भाजपा आमदार राणा पाटील यांनी नियोजन समितीकडे केल्यामुळे सावंत व राणा पाटील यांच्यात वाद सुरू असताना तानाजी सावंत यांनी ओमराजे व आमदारांची घेतलेली गळाभेट ही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात नेमकं चालले तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिंदे गटात प्रवेश करणार? राज्यात निवडणूक चिन्हाच्या निर्णयावरून ठाकरे आणि शिंदे गड एकमेकांसमोर उभे आहेत. तर धाराशिवमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री शिंदे गटाचे नेते डॉक्टर तानाजी सावंत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून घोषणा देत आहे. कालपर्यंत एकमेकावर आरोप करणारे जिल्ह्यातील नेते अचानक जवळ आले. याला भाजपा आमदार राणा पाटील यांनी पालकमंत्री यांनी वाटप केलेल्या नियोजन समितीचा कामाची तक्रार कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे खासदार आणि आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचेही जोरदार चर्चा सुरू आहेत. या हात मिळवणे नंतर आम्ही प्रवेश करणार नसल्याचं स्पष्टीकरण दोन्ही ठाकरे गटाच्या नेत्यांना द्यावा लागले आहे. नियोजन समितीच्या कामाची तक्रार राणा पाटील यांनी नियोजन विभागाकडे लेखी पत्राद्वारे केली. मात्र, याबाबत त्यांनी आपली उघड भूमिका माध्यमांसमोर अद्याप मांडली नाही. राणा पाटील यांनी भूमिका जरी मांडली नसली तरी माध्यमातून आलेल्या बातम्या या सावंत यांच्या जिव्हारी लागल्या आणि त्यांनी जाहीर कार्यक्रमातून राणा पाटील यांचे नाव न घेता पाटील कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आमदार राणा पाटील आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत समर्थक यांच्यात वाद सुरू झाला आहे. आमदार राणा यांना कुणाची फूस आहे? राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस की भाजपमधील कुणाची? असा आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन केला. ‘जशास तसे उत्तर दिले जाईल’ राज्याचे आरोग्यमंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत निधी वाटपाबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राणा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आमदार राणा पाटील यांचा बोलवता धनी कोण? असा सवाल तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केला. विशेष म्हणजे येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर दिले जाईल, अशा इशारा सावंत यांच्या समर्थकांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







