मुंबई, 9 मे: मुंबईत कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोरोनाबाधित रुग्णानं हॉस्पिटलमध्येच आत्महत्या केला आहे.
मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. एका 60 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णानं थेट हॉस्पिटलच्या नवव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आठ दिवसांपूर्वा कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा.. भीषण अपघात: डॉक्टर पत्नीसह पतीचा मृत्यू, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य
दुसरीकडे, सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. रमेश भारमल हे सायन रुग्णालयातील नवे अधिष्ठाता असणार आहे.
मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेलाही जाग आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी मुंबईत स्वतंत्र शवागृह असणार आहे. याबाबत मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा.. या गावात लोकच काय तर जनावरांनाही No Entry,तरुणांनी हातात घेतले दांडुके
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी आता स्वतंत्र शवागृह तयार केले जाणार आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. बेड फूल्ल झाले आहेत, असं सांगून खासगी रुग्णालय रुग्णांना पिटाळून लावते. रुग्णांना दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करते. अशा रुग्णालयांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेच्या नियमानुसार, खासगी रुग्णालयात गरीबांसाठी 20 टक्के बेड राखून ठेवणे बंधनकारक आहे.