राहुल खंदारे, बुलडाणा, 30 मार्च: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) प्रत्येक रुग्णालयं, खाजगी क्लिनिक यांच्याकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र बुलडाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येतो आहे. याठिकाणी असणाऱ्या जिल्हा स्त्री (Buldana Jilha Stree Rugnalaya) रुग्णायलामध्ये अनागोंदी कारभार पाहायला मिलाला. एका कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) रुग्णाच्या तब्येतीशी हेळसांड केल्याने या रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे.
याठिकाणी पोलीस कर्मचारी दिगंबर कपाटे (Digambar Kapate) दाखल झाले होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दिगंबर यांना यावेळी चक्क एक्सपायर झालेले अर्थात मुदत संपलेले इन्सुलिन देण्यात आले. याठिकाणी दाखल असताना दिगंबर यांनी कोणतीच वाच्यता केली नाही, मात्र त्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी घडला प्रकार सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे.
(हे वाचा-विनामास्क फिरले म्हणून रस्त्यावरच...; मुंबई पोलिसांच्या अजब शिक्षेचा VIDEO)
कपाटे यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर ते या रुग्णालयात दाखल झाले होते. डायबेटिस असल्यामुळे त्यांना इन्सुलिन घ्यावं लागत असे. मात्र याठिकाणी त्यांच्या तब्येतीची हेळसांड करत त्यांना एक्सपायर झालेले इन्सुलिन देण्यात आल्याचा आरोप कपाटे यांनी केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यासारख्या फ्रंटलाइन वर्करबरोबर जर असा प्रकार होत असेल तर सामान्य माणसांची किती हेळसांड होत असेल? त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे काही सवाल या प्रकारानंतर उपस्थित केले जात आहेत.
(हे वाचा-कोरोनाचा शरीराप्रमाणे मनावरही परिणाम; पुण्यातील संशोधकांनी दाखवली दुसरी बाजू)
काय आहे बुलडाण्यातील कोरोनाची परिस्थिती?
बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा शिरकाव हा अतिशय झपाट्याने होत आहे. त्यात जिल्हावासी अजूनही गंभीर नसल्याचे चित्र आहे. गेल्या 48 तासात जिल्ह्यात तब्बल 1244 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दर दिवसाला कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन वेळोवेळी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र त्याकडे दूर्लक्ष होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona hotspot, Covid-19, Maharashtra