मुंबई, 28 जून : संत महात्म्यांवर आधारित अनेक मालिका सध्या टेलिव्हिजनवर सुरू आहेत. प्रेक्षकांचा या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळतोय. सासू -सूनांच्या भांडण, कटकारस्थानं पाहण्यापेक्षा प्रेक्षक वर्ग ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘संत गजानन शेगावीचे’, ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’, ‘योगयोगेश्वर जय शंकर’ सारख्या मालिका पाहण्यासाठी प्रामुख्यानं प्राधान्य देतात. संत माहात्म्यांना मानणारा मोठा वर्ग समाजात आहेत. त्यामुळे या मालिका फार श्रद्धेने पाहिल्या जातात. मालिकेत कलाकार देखील ती भुमिका उत्तमरित्या साकारतात. अशा भुमिका साकारणाऱ्या कलाकारांना नेहमीच त्या भुमिकेची प्रचिती आल्याचं पाहायला मिळतं. अनेक कलाकारांनी त्यांना प्रत्यक्ष आलेले अनुभव सांगितले आहेत. बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या सेटवर देखील संपूर्ण टीमला बाळुमामांचा अनुभव आला. बाळुमामांची भुमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे यानं सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. पहिल्या एपिसोडपासून मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे. अभिनेता सुमीत पुसावळे याने बाळुमामांची भुमिका उत्तमरित्या साकारली आहे. मुंबईच्या फिल्मसीटमध्ये बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचं शुटींग सुरू आहे. फिल्मसिटीच्या भागात मुसळधार पाऊस असला तरी शुटींग थांबवावं लागलं. मालिकेचा बराचसा सेट हा मोकळ्या भागात आहे. बाळुमामांचा तळ ज्या भागात दाखवला आहे तो भाग देखील मोकळ्या जागेत आहे. हेही वाचा - लेकासाठी कायपण! महेश मांजेरकरांनी चक्क मुलाच्या हॉटलेमध्ये स्व:ताच्या हाताने बनवलं जेवण, आकाश ठोसरनं शेअर केला खास व्हिडिओ
मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर बाळुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचं शुटींग थांबवण्यात आलं. मोकळ्या जागी उभा करण्यात आलेला मामांच्या तळ पाऊसात भिजून गेला. शुटींग वेळी तळात एक दिवा पेटवला जातो. बाहेर मुसळधार पाऊस सरू असतानाही तळातील दिवा तसाच सुरू होता. अभिनेता सुमीत पुसावळेने सेटवरील हा व्हिडीओ शेअर केला आहे.
सुमीतनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट्स करत बाळुमामांच्या चमत्काराचं आश्चर्य व्यक्त केलंय. एका युझरनं लिहिलंय, “हे पाहून अंगावर काटाच आला. खरोखर देव आहे या जगात”. तर दुसऱ्या युझरनं लिहिलंय, “अस्तित्वाची प्रचिती, मामांची कृपा आहे”. तिसऱ्या युझरनं लिहिलंय, “माझ्या बाळूमामाच्या तळाला अख्या जगात जोड नाही”.