पालघर, 02 मे : चोर समजून 2 साधू आणि वाहनचालकाला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी 101 जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु, गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एक आरोपीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. या आरोपीच्या सहवासातील इतर 20 सह आरोपी व 23 पोलीस कर्मचाऱ्यांना अलगीकरण करण्यात येत असून या सर्वांचे घशाचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 16 एप्रिल रोजी झालेल्या या हत्याकांडातील 22 आरोपी वाडा येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. या सर्व आरोपींची कोरोना तपासणी 18 एप्रिल रोजी करण्यात आली असता सर्वांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले होते. दरम्यान, या रुग्णांचे दुसरे अहवाल शुक्रवारी रात्री उशिराने प्राप्त झाल्यानंतर त्यापैकी एक आरोपीला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. हेही वाचा - बापरे! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 132 साप, गावकऱ्यांनी घाबरून सगळ्यांना केलं ठार या आरोपीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे. या आरोपीच्या सोबत असणारे इतर 20 सह आरोपी तसेच 23 पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे अलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या घशाचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या आरोपीच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यासाठी डहाणू येथील आरोग्य पथक रवाना झाल्याची माहिती देखील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे. हेही वाचा - पालघर हत्याकांड : जंगलात लपून बसले होते आरोपी, ड्रोनच्या मदतीने पकडले VIDEO गडचिंचले हत्याकांडप्रकरणी सुरुवातील 101 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी 5 जणांना ताब्यात घेतल्यामुळे संख्या 106 वर पोहोचली. या सर्व आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून त्यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. हे सर्व 30 एप्रिल रोजी डहाणू न्यायालयात सुनावणीदरम्यान एकत्र आले होते, त्यापैकी एक कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरणार आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.