ब्रिसबेन, 21 फेब्रुवारी : आपल्या मुलाला साधं खरचटलं तरी आई कळवळते. मग विचार करा एखादा मुलगा आपल्या आईला म्हणत असेल की 'मला दोरखंड दे, मी फास लावून घेतो'. विचार करूनच अंगावर काटा उभा राहतो की त्या आईच्या मनावर काय आघात झाला असेल. आपल्या हतबल मुलाचा व्हिडीओ या आईने फेसबुकवर शेअर केला आहे. ही आई तिच्या मुलाला मदत करण्याची मागणी करत आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडची राजधानी ब्रिसबेन याठिकाणी ही घटना घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक बुटका मुलगा त्याचं आयुष्य संपवण्यासाठी आईकडे मागणी करत आहे.
त्याचं नाव क्वादेन असून त्याचं वय 9 वर्ष आहे, मात्र त्याची उंची खूपच कमी असल्यामुळे त्याच्या शाळेतील विद्यार्थी त्याची टर खेचतात आणि त्याचा छळ करतात. क्वादेन Achondroplasia या बुटकेपणाच्या आजारामुळे ग्रस्त आहे.
(हेही वाचा- 'ती' वाजवत राहिली वायोलिन, अन् डॉक्टरांनी केली मेंदूची सर्जरी, पाहा VIDEO)
या छळाची तीव्रता इतकी आहे की या चिमुकल्याला ते सहन होत नाही आहे आणि त्यामुळे तो मरण देखील पत्करायला तयार झाला आहे. त्याच्या आईने हा व्हिडीओ शेअर करताना असं लिहिलं आहे की, 'माझ्या मुलाचा असा छळ वारंवार केला जातो. आज पुन्हा एकदा मी त्याचा छळ होताना पाहिलं. शाळेच्या मुख्याध्यापकांना सुद्धा याबाबत माहिती दिली आहे. मी सर्वांना सांगू इच्छिते की, मुलांना शाळेत गुंडगिरीला सामोरं जावं लागत असेल तर नेमकं काय होतं. कृपया तुम्ही तुमच्या मुलांना, कुटुंबीयांना आणि मित्रांना याबाबत शिकवण द्याल का? केवळ एका घटनेमुळे मुलं स्वत:ला मारण्याची भाषा करू शकतात आणि तुम्ही विचार करत आहात की मुलं आत्महत्या का करत आहेत. माझ्या 9 वर्षाच्या मुलाला केवळ शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचं आहे आणि मज्जा करायची आहे. पण प्रत्येक दिवशी त्याला मानसिक छळाला सामोरं जावं लागत आहे.
प्रत्येक दिवशी नवीन टोमणे, नवीन छळ सहन करावा लागतोय.' या मुलाची आई याराका बेलेस यांनी या घटनेचं FACEBOOK LIVE केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये मुलांसोबत कसं वागावं असा प्रश्न त्यांनी तमाम फेसबुक युजर्सना विचारला आहे. त्यावेळी बोलताना या माऊलीचा बांध फुटला आहे.
(हेही वाचा-2800 फुट उंचावरून या मुलीने केलं असं काही, VIDEO पाहून हृदयाचे ठोके नक्की वाढतील)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. स्थानिक पातळीवर क्वादेन आणि त्याच्या आईला अनेकांनी मदत केली आहे. त्याचप्रमाणे मानसिक छळाविरोधात आवाज उठवला आहे. त्यानंतर क्वादेनबरोबरचे अनेक cute फोटो क्वीन्सलँडमधील काही प्रसिद्ध व्यक्तींनी शेअर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.