27 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काय भाषण केलं आहे ते तपासले जाईल, यात जर काही चुकीचं आढळलं तर कायदेशीर कारवाई केली जाईल. टोल नाक्यांची तोडफोड करणार्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल असं राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केलं.
तसंच टोल नाक्याची जी तोडफोड केली आहे, जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे त्याचा खर्च संबंधीत पक्षाकडून वसूल केला जाईल असंही आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल देऊ नका जर कुणी अडवलं तर त्याला तुडवा असे आदेश आपल्या कार्यकर्त्याला दिले होते त्यानंतर मनसेसैैनिकांनी राज्यभरात टोल नाक्यांची तोडफोड केली. मनसेच्या राड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोडाफोडी- तोडाफोडीचं राजकारण अजिबात खपवून घेणार नाही, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणार्यांची अजिबात गय केली जाणार नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेला दिलाय. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री आर. आर.पाटील यांनीही टोल नाक्यांची तोडफोड करण्याची गय केली जाणार नाही, जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे त्याचा खर्च संबंधीत पक्षाकडून वसूल केला जाईल असंही आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केलं.