वारंगळ, 8 एप्रिल : एका 32 वर्षीय महिलेनं तिच्या पतीच्या मृत्यूनंतर एकेरी मातृत्वाचा (Single Mother) निर्णय घेत 11 महिन्यांनी बाळाला जन्म दिला आहे. यासाठी गोठवलेल्या भ्रूणाचा (Frozen Embryo) वापर करून गर्भधारणा करण्यात आली. ही महिला आणि तिचा पती यांना गेल्या नऊ वर्षांपासून मूल हवे होते. सर्व प्रयत्नांनंतर अखेर त्यांनी IVF चा आधार घेण्याचं ठरवलं. या ट्रीटमेंटच्या माध्यमातून 2020 मध्ये भ्रूण तयार करण्यात आलं. मात्र, या महिलेला आणि तिच्या पतीला कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) झाला. यातून ती महिला बरी झाली. पण तिच्या पतीचं निधन झालं. या धक्क्यातून सावरण्यास तिला अनेक महिने लागले. अखेर तिनं मनाचा पक्का निर्धार करत हे मूल जन्माला घालण्याचा आणि त्याचं पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला. या महिलेला मुलगा झाला असून बाळ आणि आईची प्रकृती उत्तम आहे.
कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातून बनली आई
पतीच्या निधनानंतर गर्भधारणाही झालेली नसताना कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातून ही महिला आई बनली आहे. तेलंगणातल्या मंचेरियाल येथे ही घटना घडली. मंचेरियल येथील या जोडप्याला गेल्या नऊ वर्षांपासून स्वतःचं मूल हवं होतं. मात्र, नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होऊ शकली नाही. त्यांनी 2020 मध्ये वारंगळमधील ओएसिस फर्टिलिटी सेंटरशी संपर्क साधला. प्रजनन केंद्रातील डॉक्टरांनी त्यांच्याकडून महिलेच्या शरीरातून एग्ज आणि तिच्या पतीचं वीर्य IVF (In Vitro Fertilization) ट्रीटमेंटसाठी घेतलं आणि त्याच वर्षी मार्चमध्ये याची प्रक्रिया सुरू केली. पाच दिवसांनी गर्भाची निर्मिती झाली. जेव्हा या जोडप्याला त्यांचं मूल होण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली. मात्र, कोविड-19 महामारीनं त्यांच्या स्वप्नाचा भंग केला. दोघा पती-पत्नींना कोरोनाचा संसर्ग झाला. पत्नी या संसर्गातून बरी झाली. परंतु तिच्या पतीचं मे 2020 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी निधन झालं.
हे वाचा - अशा पद्धतीनं भारतातही होऊ शकते वीजनिर्मिती, Video शेअर करत आनंद महिंद्रांनी गडकरींना सुचवलं
हे वाचा - आपला ‘O Blood Group’ आहे असं समजून केलं रक्तदान; मात्र, कळली ही खास बाब
एकेरी मातृत्वाचा निर्णय
IVF ट्रीटमेंट पुढे जाण्यासाठी असलेले कायदेशीर अडथळे टाळण्यासाठी तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयानं या प्रकरणात महिलेनं तिच्या विवेकबुद्धीनुसार तिनं स्वतःच निर्णय घ्यावा, असं म्हटलं. तेव्हा डॉक्टरांनी ऑगस्ट, 2021 मध्ये तिच्यावर IVF उपचार सुरू केले. तिनं 22 मार्च 2022 रोजी मुलाला जन्म दिला. पतीच्या मृत्यूनंतर बाळाला जन्म देण्याच्या आणि एकेरी पालकत्व स्वीकारण्याच्या तिच्या निश्चयाचं सर्व स्तरातील लोकांकडून कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.