नवी दिल्ली 05 जानेवारी : सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टर अपघात (Mi-17V5 Helicopter Crash) प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल बुधवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना देण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलाच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी करत असलेले त्रि-सेवा तपास पथक बुधवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर सादरीकरण करून आपला अहवाल सादर करणार आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि 12 इतर सैनिक 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले. यानंतर हवाई दलाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.
तपास पथकाचे नेतृत्व एअर मार्शल मानवेंद्र सिंग करत आहेत आणि त्यात लष्कर आणि नौदलातील दोन ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, संरक्षणमंत्र्यांना अहवालाचे सादरीकरण करताना भारतीय हवाई दलाचे उच्च अधिकारी तसेच संरक्षण मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. सूत्रांचं म्हणणं आहे की या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ट्राय-सर्व्हिस टीमने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर रिवाईस करण्याची शिफारस केली आहे.
8 डिसेंबर रोजी जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 लष्करी अधिकारी Mi-17V5 हेलिकॉप्टरमध्ये होते. हे सर्व लोक वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये जात असताना येथे पोहोचण्याच्या काही मिनिटांपूर्वीच हेलिकॉप्टरचा अपघात झाला. जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची माहिती हवाई दलाने संध्याकाळी 6 वाजून 03 मिनिटांनी दिली. यानंतर भारतीय हवाई दलाने अपघाताचं कारण जाणून घेण्यासाठी तपासाचे आदेश दिले.
या दुर्घटनेमागे खराब हवामानही कारण असू शकतं, असंही मानलं जात आहे. मात्र, हवाई दलाचा तपास अहवाल समोर आल्यानंतरच अपघाताचं ठोस कारण समोर येईल. त्याचवेळी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर ब्लॅक बॉक्सही (Black Box) जप्त करण्यात आला आहे. ब्लॅक बॉक्सला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (Flight Data Recorder) असेही म्हणतात. ब्लॅक बॉक्स जप्त केल्याने या प्रकरणाबाबतची बरीच महत्त्वाची माहिती बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Helicopter, Rajnath singh