कोलकाता, 06 मार्च: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची (West Bengal Election 2021) धामधूम सुरू आहे. या निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चुरस असणार आहे. या दरम्यान झालेल्या बाँबस्फोटामुळे या लढाईला गालबोट लागलं आहे. दक्षिण 24 परगणा याठिकाणच्या गोसाबामध्ये हा बाँबस्फोट झाला आहे. देशी बाँब बनवताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या स्फोटानंतर भाजप आणि टीएमसी एकमेकांकडे बोट दाखवताना दिसत आहेत. या धमाक्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
तृणमूल काँग्रेसकडून असा आरोप केला जात आहे की, भाजपचे कार्यकर्ते बाँब बनवत होते त्यावेळी हा स्फोट झाला. तर भाजपचा असा आरोप आहे की टीएमसीच्या लोकांनी भाजप कार्यकर्त्यांवर जाणूनबुजून हा हल्ला केला. पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बाँब बनवत असताना हा स्फोट झाला आहे.
(हे वाचा-'मुलाच्या कमाईवर केवळ पत्नी आणि मुलांचा नाही, आई वडिलांचाही समान अधिकार')
टीएमसीचे जयंत नस्कर यांनी असा आरोप केला आहे की, भाजपचे कार्यकर्ता त्यांच्यापैकी एकाच्या घरी बाँब बनवत होते, त्यावेळी हा स्फोट झाला. त्यांनी असे म्हटले की, भाजपचे लोक अँटी सोशल लोकांना सोबत घेत आहेत. बाँब बनवत असताना 6-7 लोकं जखमी झाले असून त्यातील काही जण मृत्यूमुखी देखील पडू शकतात, असंही नस्कर म्हणाले. भाजपच्या संजय नायक यांनी हा आरोप फेटाळला आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की गेल्या अनेक वर्षांपासून जयंत नस्कर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर बाँब फेकले जातात. भाजप कार्यकर्त्यांना बंदुक दाखवून धमकी दिली जाते, त्याचाच हा एक नमुना होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Bomb Blast, Mamata banerjee, PM narendra modi, TMC, Trinamool congress, West bengal