नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील (Maharashtra) महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळणार असल्याचं भाजप नेते वारंवार बोलत असतात. त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील मविआ सरकार मार्च महिन्यात कोसळणार असा दावाच नारायण राणेंनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर मार्च महिन्यात महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार अशी राजकीय भविष्यवाणी नारायण राणेंनी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी जयपूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाहीये त्यामुळे तिथे तसं होत आहे. लवकरच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल. मार्च महिन्यात भाजपचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित असा बदल दिसून येईल.
वाचा : चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांनंतर आता शरद पवारही दिल्लीत दाखल
काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात
नारायण राणे पुढे म्हणाले, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. जाहीरपणे गोष्टी गेल्या तर एखादा महिना सरकार आणखी राहिल आणि मग भाजपचं सरकार येण्याची तारिखही पुढे जाईल.
राणेंच्या भविष्यवाणीवर अनिल परब म्हणाले
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या राजकीय भविष्यवाणीवर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, राणे काय म्हणतात यावर सरकार चालत नाही, संख्या बळावर चालतं आघाडीकडे पूर्ण संख्याबळ आहे आणि हे सरकार 5 वर्षे पूर्ण करेल.
वाचा : भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर नाशकातील वातावरण तापलं, भाजपने भुजबळांवर केला गंभीर आरोप
वर्षा गायकवाड यांचा फडणवीसांना टोला
वर्षा गायकवाड यांनी नारायण राणेंच्या विधानावर प्रतिक्रिया देत म्हटलं, नारायण राणे पुन्हा सरकार येईल म्हणत असतील यापूर्वी ही काही पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणत आलेत. केंद्रीय मंत्र्याने असे स्टेटमेंट देतांना भान ठेवले पाहिजे.
चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस दिल्लीत
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत (Devendra Fadnavis on Delhi tour) दाखल झाले आहेत. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता की अचानक हा दौरा ठरला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. असं म्हटलं जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित काही बैठका आहेत आणि त्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले आहेत. यासोबतच राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांचं पूर्नवसन सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं त्यांना आता विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांनाही विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं त्यांनाही राष्ट्रीय पातळीवर सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, महाराष्ट्र