हिमांशु श्रीवास्तव, प्रतिनिधी सीतापुर, 30 जून : अनेक जण आता नोकरी करण्याच्या तुलनेत उद्योगधंद्याला प्राधान्य देत आहेत. तसेच त्यात ते यशस्वी होत असल्याचीही उदाहरणे तुम्ही वाचली असतील. सध्या अनेक ठिकाणी चहाची दुकाने प्रसिद्ध असल्याचेही तुम्ही वाचले असेल. आज एका अशाच चहाच्या दुकानाबाबत जाणून घेऊयात. उत्तरप्रदेश राज्यातील सीतापूर शहरातील रोडवेज बस स्थानकाजवळ एक खास चहाची कॅन्टीन आहे. दोन वर्षांपूर्वी ही कॅन्टीन सुरू झाली. शुभम कुमार हे या कॅन्टीनला सांभाळतात. त्यांनी आपल्या चहाच्या कॅन्टीनचे नाव हसलर ठेवले आहे. इथे वेगवेगळ्या चहाचे दर वेगवेगळे आहेत.
येथील एका कप चहाची किंमत 15 ते 40 रुपयांपर्यंत आहे. याठिकाणी चहाप्रेमींची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते. शुभम कुमार यांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात दररोज 800 ते 1000 कप चहा आणि तर उन्हाळ्यात 400 ते 500 कप चहाची विक्री होते. तर चहासोबतच ग्राहकांना इतर प्रकारचे फास्ट फूडही याठिकाणी मिळते. सकाळपासून रात्रीपर्यंत याठिकाणी चहाप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते. याठिकाणी आलेले एक ग्राहक आशिष यांनी सांगितले की, मी खैराबाद येथे राहतो. मात्र, जेव्हापासुन हे चहाचे दुकान सुरू झाले आहे, तेव्हापासून आम्ही इथेच चहा प्यायला येतो. तसेच लोकांना या चहाबाबतही सांगू इच्छितो की, इथला चहा खूपच छान असतो. इथल्या गर्दीवरुन हा चहा किती चांगला आहे, याचा अंदाज लावू शकतो, असेही ते म्हणाले. तर दुकानमाल शुभम कुमार यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून आम्ही हा चहा विकत आहोत. याठिकाणी 7 प्रकारचा चहा प्यायला मिळतो. दररोज सुमारे 400 ते 500 लोक याठिकाणी चहा प्यायला येतात. सीतापूर जिल्ह्यासोबतच बाहेरच्या जिल्ह्यातील लोकही याठिकाणी चहा प्यायला येत असल्याचे त्यांनी सांगितले.