अंजली सिंह राजपूत, प्रतिनिधी लखनऊ, 14 जुलै : उत्तर प्रदेशातून देशभरात पसरलेल्या ज्योती मौर्या आणि आलोक मौर्या प्रकरणाची धग पाहता पाहता देशभरात पसरली. सध्या हे प्रकरण चांगलंच तापलंय. ज्योती मौर्या उपविभागीय दंडाधिकारी कशा झाल्या, त्यांचं आलोक मौर्यांशी लग्न कसं जुळलं, मनीष दुबे कोण, त्यांच्याबाबत आलोक मौर्यांना कसं कळलं, मनीष दुबे खरंच ज्योती मौर्यांचा प्रियकर आहे का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लोक गुगलवर शोधू लागले आहेत. अशातच आता थेट ज्योती मौर्या यांच्या शिक्षकांनीच यावर भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले, पाहूया. काही दिवसांपूर्वी आलोक मौर्या यांच्या गावकऱ्यांनी दोघांचे कुटुंबीय आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते, असा गौप्यस्फोट केला होता. तर आता ज्योती मौर्या यांचे शिक्षक राजेश मेहतानी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ज्योती यांना ऑक्टोबर 2016 ते जानेवारी 2017 दरम्यान प्रशिक्षण दिलं होतं. पीसीएस अधिकाऱ्यांच्या 46व्या बॅचमध्ये ज्योती यांचा समावेश होता. राजेश मेहतानी म्हणाले, ‘ज्योती ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. म्हणूनच इतक्या वर्षांनंतर आजही ती मला अगदी ठळकपणे आठवते. वर्गात एखाद्या विषयावर जेव्हा ती एखादी शंका उपस्थिती करायची, तेव्हा त्यावर उत्तर देतानाही विचार करावा लागायचा. मात्र कितीही हुशार असली तरी तीही एक माणूस आहे, आज जे काही घडतंय त्याचा तिला प्रचंड त्रास होत असणार. माझ्या अष्टपैलू विद्यार्थिनीबाबत समोर येणारा वाद माझ्यासाठी फार वेदनादायी आहे.’
राजेश मेहतानी पुढे म्हणाले, ‘ज्योती मौर्याबाबत सोशल मीडियावर लोक स्वतः न्यायाधीश असल्यासारखे कमेंट करत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येक प्रकरणाला दोन बाजू असतात. या प्रकरणाची दुसरी बाजूही लवकरच समोर येईल. तोपर्यंत आपण धीर धरायला हवा, स्वतःला तज्ज्ञ समजून वाटेल ते तर्क लावायला नको. कदाचित दिसतंय त्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळंच असेल. अशात आपल्या मतामुळे कोणाचंतरी व्यक्तिमत्त्व मलीन होतंय, कोणाचंतरी मोठं नुकसान होतंय, याचा लोकांनी गांभीर्याने विचार करायला हवा आणि विचारपूर्वक मत मांडायला हवं.’ SDM की जिल्हा कमांडंट होमगार्ड, कोण आहे भारी? जास्त POWER कोणाकडे? त्याचबरोबर थेट ज्योती आणि आलोक यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, ‘नवरा-बायकोने एकमेकांवर आरोप करणं हे काही नवीन नाही. मात्र एखाद्या यशस्वी व्यक्तीला नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकवलं जातं. म्हणूनच लोकांनी या प्रकरणाला प्रमाणापेक्षा जास्त मोठं बनवलंय. ज्योती मौर्या एसडीएम नसत्या तर कदाचित हे प्रकरण इतकं तापलं नसतं’, असं म्हणत त्यांनी ज्योती यांच्या टीकाकारांना फटकारलं.