रिलायन्स फाउंडेशननं सुरू केलं जगातील सर्वात मोठं मिशन, 3 कोटी लोकांना करणार अन्नदान

रिलायन्स फाउंडेशननं सुरू केलं जगातील सर्वात मोठं मिशन, 3 कोटी लोकांना करणार अन्नदान

भारतातील तब्बल 3 कोटी अल्पभूधारकांना अन्नदान करण्याची घोषणा रिलायन्स फाउंडेशनने केली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल : कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला मदत करण्यासाठी प्रत्येक जण पुढे येत आहे. यात आता रिलायन्स फाउंडेशनने खारीचा वाटा उचलला आहे. भारतातील तब्बल 3 कोटी अल्पभूधारकांना अन्नदान करण्याची घोषणा रिलायन्स फाउंडेशनने केली आहे. यासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने 'मिशन अन्न सेवा' या मोहीमेस सुरुवात करण्यात आली आहे. मिशन अन्न सेवा ही एका कॉर्पोरेट फाउंडेशनने हाती घेतलेली जगातील सर्वात मोठी मोहीम आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची रिलायन्स फाऊंडेशन ही एक संस्था आहे. या संस्थेच्या वतीने याआधी 16 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 68 जिल्ह्यात 2 कोटीहून अधिक लोकांना अन्नदान केले होते.

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी याची घोषणा करताना सांगितलं की, “कोव्हिड-19 हा एक भयंकर साथीचा रोग आहे. भारतामध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर, आपल्या दैनंदिन वेतनावर अवलंबून असलेल्या मजूरांची काळजी वाटते. तेसुद्धा आपल्या परिवाराचे - आपल्या भारत परिवारचे सदस्य आहेत. म्हणूनच, रिलायन्स फाउंंडेशनने मिशन अन्न सेवा ही मोहीम सुरू केली आहे. यातून आम्ही गरजूंना अन्न पुरवण्याची प्रतिज्ञा करतो". तसेच, या मोहीमेबाबत सांगताना नीता अंबानी यांनी, "आपल्या संस्कृतीत अन्न दान हे महादान मानले जाते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे’, असे आपल्या उपनिषदे शिकवतात. मिशन अन्न सेवेच्या माध्यमातून आम्ही देशातील 3 कोटींहून अधिक दुर्लक्षित समाज आणि कामगारांना अन्न दान करणार आहोत”, असे सांगितले.

वाचा-Coronavirus विरोधातल्या लढ्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने केली 500 कोटींची मदत

या कार्यक्रमाअंतर्गत रिलायन्स फाउंडेशन या कुटुंबांना शिजवलेले अन्न, रेडी टू इट पाकिटे आणि रेशन किट देण्यात येणार आहे. तसेच, सामुदायिक स्वयंपाकघरांना मोठ्या प्रमाणात रेशन पुरवले जाणार आहे. याअंतर्गत दिवसावर पोट असणारे मजूर, झोपडपट्टीवासी, नागरी सेवा प्रदाता, कारखाना कामगार, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमातील रहिवासी यांचा समावेश आहे. याशिवाय, कनिष्ठ वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा दलासारख्या अग्रभागी कामगारांनाही जेवण पुरवले जाणार आहे. याचबरोबर काही ठिकाणी रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट सुपरस्टोर, रिलायन्स स्मार्ट पॉईंट आणि सहकारी भंडार यासारख्या ठिकाणी धान्य टोकनचे वितरणही करणार आहे.

वाचा-आता घरच्या घरी कळतील कोरोनाची लक्षणं, रिलायन्सने आणले MyJio Coronavirus Tool

रिलायन्स रिटेलचे कर्मचारी या कार्यक्रमास आवश्यक ती मदत करतील. मुंबई, सिल्वासा, वडोदरा, पातालगंगा, हजीरा, झज्जर, शहडोल, जामनगर, दहेज, बाराबंकी, नागोठाणे, गादीमोगा आणि होशियारपूर यांसारख्या रिलायन्स साइटवरील कर्मचारी स्वयंसेवक आपापल्या ठिकाणी गरीब समाजात मोफत जेवणाचे वाटप करीत आहेत. पश्चिम बंगाल, केरळ आणि ओडिशामधील काही विशिष्ट रिलायन्स पेट्रोल स्टेशनवरील कर्मचारी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या ट्रक चालकांना मोफत जेवण वाटप करीत आहेत.

वाचा-देशात Covid-19 च्या रुग्णांसाठी पहिलं स्वतंत्र हॉस्पिटल सज्ज; रिसायन्स इंडस्ट्री

जेवण वितरण कार्यक्रमाव्यतिरिक्त, रिलायन्स इंडस्ट्रीज लि. (RIL) आणि रिलायन्स फाउंडेशन PM Cares या फंडासाठी 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजकडून यापूर्वी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांतल्या मुख्यमंत्री निधीसाठी रिलायन्सने प्रत्येकी 5 कोटी रुपये दिले आहेत.

First published: April 20, 2020, 1:07 PM IST

ताज्या बातम्या