मराठी बातम्या /बातम्या /देश /चित्त्याची चाल आणि गरुडाची नजर, आफ्रिकेतला चित्ता भारतात आणता येईल का?

चित्त्याची चाल आणि गरुडाची नजर, आफ्रिकेतला चित्ता भारतात आणता येईल का?

भारतात 1947 साली शेवटचा चित्ता मारला गेला. 1952 साली चित्ता भारतातून नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं. आता पुन्हा एकदा आफ्रिकेतून भारतात चित्ता आणण्याच्या प्रकल्पाचा विचार होतोय. याबद्दल वन्यजीवतज्ज्ञांची काय मतं आहेत हे आम्ही जाणून घेतलं.

भारतात 1947 साली शेवटचा चित्ता मारला गेला. 1952 साली चित्ता भारतातून नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं. आता पुन्हा एकदा आफ्रिकेतून भारतात चित्ता आणण्याच्या प्रकल्पाचा विचार होतोय. याबद्दल वन्यजीवतज्ज्ञांची काय मतं आहेत हे आम्ही जाणून घेतलं.

भारतात 1947 साली शेवटचा चित्ता मारला गेला. 1952 साली चित्ता भारतातून नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं. आता पुन्हा एकदा आफ्रिकेतून भारतात चित्ता आणण्याच्या प्रकल्पाचा विचार होतोय. याबद्दल वन्यजीवतज्ज्ञांची काय मतं आहेत हे आम्ही जाणून घेतलं.

पुढे वाचा ...

आरती कुलकर्णी

‘ही गोष्ट आहे, 1972 सालची. मी तेव्हा अमेरिकेतल्या यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये एका परिषदेसाठी गेलो होतो. तिथे मला इराणच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख भेटले. त्यांच्याशी बोलताना मी भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांचा विषय काढला. इराणमधून भारतात नव्याने चित्ते आणण्याचा प्रस्ताव मी त्यांच्यासमोर ठेवला. इराणला आपल्याकडचे सिंह द्यायचे आणि त्यांच्याकडून आशियाई चित्ते भारतात आणायचे असं ठरलं...’ भारताचे माजी वन्यजीव संचालक डॉ.एम. के. रणजितसिंह सांगतात...‘त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनीही या प्रकल्पाला होकार दिला होता. गुजरातमधल्या एका ठिकाणी हे चित्ते आणता येतील अशी शक्यता दिसू लागली. आम्ही त्यावर कामही सुरू केलं पण त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या.इराण आणि भारतात सत्ताबदल झाले आणि हा प्रकल्प मागे पडला...आता इराणमध्येच 30 पेक्षा कमी चित्ते राहिले आहेत. त्यामुळे इराणमधून हे चित्ते आणणं शक्य नाही. आता आपल्याला आफ्रिकेतून हे चित्ते आणावे लागतील.’

सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील

आफ्रिकेतून चित्ता भारतात आणण्याच्या प्रकल्पाबद्दल संशोधन करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नुकताच हिरवा कंदील दिलाय आणि याबद्दलचा अहवाल देण्याची जबाबदारी डॉ. एम. के. रणजितसिंह यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीवर सोपवण्यात आली आहे. चित्ता खरंच भारतात आणावा का ? यावर रणजितसिंह यांचा प्रश्न आहे, 'चित्ता आणला तर नुकसान काय आहे? आत्तापर्यंत आपण आपलं वन्यजीवन वाचवतच आलो आहोत.मग चित्त्यामुळे हे प्रयत्न थांबणार तर नाहीत. उलट त्याला गती येईल.'

(हेही वाचा : राहुल गांधींच्या दंड्याला मोदींचं सूर्यनमस्कारांनी उत्तर, लोकसभेत रंगला सामना)

चित्ता प्रकल्पातली आव्हानं

पण सर... भारतातले सिंह इतके संकटात असताना आपण ही नवी जोखीम स्वीकारावी का ? शिवाय चित्त्यांसाठी गवताळ माळरानावरची वसतिस्थानं आपल्याकडे उरली आहेत का ? त्यांच्यासाठी पुरेसं भक्ष्य आहे का ? माळरानांवरचे माळढोक वाचवण्याचं आव्हानही मोठं आहे...

डॉ. रणजितसिंह ही वस्तुस्थिती नाकारत नाहीत पण त्यांचं चित्त्यावरचं प्रेम जराही कमी झालेलं नाही. ते सांगतात, ‘भारतातल्या विस्तीर्ण माळरानांवर एकेकाळी चित्ते होते पण जशीजशी शेती वाढत गेली तसतशी माळरानं आक्रसू लागली, शिकारीचं प्रमाण वाढलं आणि चित्त्यांनी मध्य भारतातल्या साल वृक्षांच्या जंगलात आश्रय घेतला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात भारतातले अगदी शेवटच्या टप्प्यातले चित्ते दिसले ते साल वृक्षांच्या जंगलात. ते तिथे लपूनछपून राहत होते. याच जंगलांमधली खुली माळरानं ते शिकारीसाठी वापरत होते पण विणीसाठी त्यांनी या साल वृक्षांच्या जंगलात आश्रय घेतला.’

(हेही वाचा : चीनमुळे जगभरात पसरला कोरोनाव्हायरस, 30 तासांचे नवजात बाळ गर्भातच झाले रुग्ण)

1947 मध्ये शेवट

भारतातला शेवटचा चित्ता 1947 साली बस्तरमध्ये मारला गेला.महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी तो मारला. त्याची रेकॉर्ड्स बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर भारतात चित्ता दिसलाच नाही. 1952 साली चित्त्याला नामशेष असं घोषित करण्यात आलं. आता आपल्याकडे चित्ता उरला आहे, तो फक्त शाही राजवाड्यांमध्ये पेंढा भरलेल्या स्वरूपात. वाघ, सिंह, हत्ती, गेंडे आणि चित्ते या जनावरांना त्यांच्याबद्दलच्या दबदब्यामुळे ‘बिग 5’असं म्हटलं जातं. यामधला चित्ता आपल्याकडे नाही पण बिबट्या आहे.

भारतीय चित्ता म्हटलं की आपल्याला इतिहासातच जावं लागतं. भारतात सम्राट अकबराकडे एक हजार चित्ते होते. या चित्त्यांचा वापर मुख्यत: शिकारीसाठी व्हायचा. कोल्हापूर संस्थानच्या शाहू महाराजांनी गुजरातमधून चित्ते आणले होते तेही शिकारीसाठीच. त्याकाळी दाजीपूरसारख्या जंगलात चित्त्यांच्या मदतीनेच रानडुकरांची शिकार होत असे.

चिते की चाल, बाज़ की नज़र और बाज़ीराव की तलवार पर संदेह नहीं करते, असं बाजीराव साकारणारा रणवीरसिंग मोठ्या अभिमानाने म्हणतो पण याच भारतात ‘चिते की चाल’ रोखली गेली ती कायमचीच. चित्त्याचा इतिहास कितीही वैभवशाली असला तरी भारतातली आत्ताची वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे.

चित्ते आणणार कुठे?

केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्या काळात गुजरातमधल्या गीर नॅशनल पार्कमधून मध्य प्रदेशमधल्या कुनो अभयारण्यात काही सिंह आणले जाणार होते. त्याचवेळी आफ्रिकेतून इथे चित्तेही आणून सोडावे असा प्रस्ताव होता. पण बाहेरच्या वसतिस्थानातले चित्ते भारतात आणू नयेत या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने चित्त्यांचा प्रस्ताव नाकारला. आता मात्र आफ्रिकन आणि आशियाई चित्त्यांमध्ये साधर्म्य असल्याचं वन्यजीवतज्ज्ञांनी सिद्ध केलं. त्यामुळे आफ्रिकेतून भारतात चित्ते आणता येतील का ? यावर अभ्यास करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिलीय. तर झालं असं, गुजरातच्या गीरमधले सिंह मध्य प्रदेशात न्यायला तिथल्या लोकांनी विरोध केला होता. त्यामुळे एकही सिंह मध्य प्रदेशात नेता आला नाही. त्यामुळे सिंहांबरोबरच चित्तेही मागे पडले.

(हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याआधी शिवसेना नगरसेवकांची राजीनाम्याची धमकी)

आफ्रिकेतल्या नामिबियामधल्या एका संस्थेने चित्त्याच्या या प्रकल्पासाठी मदत करण्याची तयारी दाखवली आहे. सध्या तरी मध्य प्रदेशातल्या नौरादेही अभयारण्यात चित्ते आणता येतील का यावर विचार सुरू आहे पण अजून कोणतीही एक जागा नक्की झालेली नाही.

आधी सिंह की आधी चित्ते?

आफ्रिकेतून आणलेला चित्ता भारतात जगू शकतो का ? वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ रवी चेल्लम यांच्या मते, आफ्रिकन चित्ता भारतातल्या जंगलात जगू शकतो पण त्यासाठी दीर्घ पल्ल्याच्या नियोजनाची गरज आहे. पण आफ्रिकन चित्त्यांपेक्षाही भारतातले सिंह, माळढोक या प्रजाती वाचवण्यावर आपण भर दिला पाहिजे.गुजरातमधले काही सिंह मध्य प्रदेशातल्या कुनोमध्ये न्यावे हे आदेश सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये दिले आहेत. तरीही याची अमलबजावणी झालेली नाही. सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य द्यायला हवं, असं त्यांना वाटतं. गीरमध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा साथीचा रोग आला तर सिंहांची प्रजातीच धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे सिंह मध्य प्रदेशमध्ये हलवणं आवश्यक आहे.

माळरानं वाचवण्याची संधी

वन्यजीव निरीक्षक आयझॅक किहिमकर यांच्या मते, आफ्रिकन चित्त्याला विस्तीर्ण माळरानं लागतात आणि काळवीटं, हरणं असं मुबलक भक्ष्यही लागतं. भारतातल्या माळरानांची स्थिती पाहिली तर सध्याच्या स्थितीत तरी हे शक्य नाही. त्यांच्या मते, चित्ता हा भारतातून इतिहासजमा झालेला प्राणी आहे ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी.असं असलं तरी डॉ. एम. के. रणजितसिंह यांना भारतात चित्ते आणणं ही माळरानं वाचवण्याची एक नामी संधी वाटते. तुम्ही वाघ वाचवलेत, सिंह वाचवायचे आहेत पण माळरानात जगणारे चित्ते, कॅरॅकल हे प्राणी महत्त्वाचे नाहीत का ? असं ते विचारतात. चित्त्याच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा माळरानांच्या संवर्धनावर भर देता येईल, असं त्यांना वाटतं.

'होम ऑफ बिग कॅट्स'

‘द बुक ऑफ इंडियन ॲनिमल्स’ या पुस्तकात एस. एच. प्रेटर म्हणतात, इंडिया इज अ होम ऑफ ग्रेट कॅट्स. या ग्रेट कॅट्समधला माळरानांवर दौडणारा चित्ता पाहायला आपण केनिया, टांझानियामध्ये जातो. त्याच्या शिकारीचा थरारही अनुभवतो. खरं सांगायचं तर आपल्याकडे चित्ता पुन्हा राहू शकतो हेही आपण विसरून गेलोय. पण एम. के. रणजितसिंह यांच्यासारखे ढाणे वन्यजीवतज्ज्ञ अजूनही त्याला भारतात आणण्याची आस धरून आहेत. या शाही प्राण्याला आफ्रिकेतून भारतात आणायचं असेल तर खरोखरच ‘चित्त्याची चाल आणि गरुडाची नजर असलेल्या तज्ज्ञांची आणि वन्यजीव कार्यकर्त्यांची गरज आहे.

===========================================================================================================

First published:
top videos

    Tags: India, Tigers, Wildlife