निलेश त्रिपाठी, रायपूर, 25 जानेवारी: छत्तीसगड सरकारनं (Chhattisgarh State Government) यंदा न्याय आणि स्वावलंबन या संकल्पनेवर आधारित एक अत्यंत अभिनव कॅलेंडर (Calender) प्रकाशित केलं आहे. सर्वत्र या कॅलेंडरची विशेषत: त्यातील सप्टेंबर महिन्याच्या पानाची जोरदार चर्चा होत आहे. सर्वांचे लक्ष या पानावरील एका फोटोनं वेधून घेतलं आहे. बदलत्या समाजाचं, सरकारी धोरणांचे दर्शन घडवणारे हे पान नव्या भारतातील आशादायी भविष्याचे चित्र आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या पानावर फोटो आहे तो 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा. त्यात काय विशेष असं वाटलं ना? हे पोलीस कर्मचारी ट्रान्सजेंडर (Transgender Police ) आहेत. 2021 मध्ये ते छत्तीसगड पोलीस विभागात रुजू झाले आहेत आणि या सर्वांचे नेतृत्व केलं आहे ते विद्या राजपूत (Vidya Rajput) हिने. विद्या राजपूतच्या संघर्षामुळेच ट्रान्सजेंडर्सना पोलीस दलात संधी मिळाली आहे.
पहिल्यांदाच छत्तीसगडच्या अधिकृत कॅलेंडरमध्ये ट्रान्सजेंडर पोलिसांना स्थान मिळाले ही आपल्या समाजासाठी अभिमानाची बाब असून, यामुळे समाजात सकारात्मकता निर्माण होईल अशी भावना विद्या राजपूतनं व्यक्त केली आहे. मितवा समिती (Mitawa Commitee) या संस्थेच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर्सच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यानं ट्रान्सजेंडर्सना पोलीस भरतीत संधी मिळावी यासाठी पुढाकार घेऊन त्यात यश मिळवल्यानं केवळ छत्तीसगडमध्येच नाही तर संपूर्ण देशात तिची चर्चा आहे. आता तिला तिच्या कुटुंबानं, समाजानं जवळ केलं असलं तरी यासाठी तिला खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे.

न्यूज 18 शी बोलताना विद्यानं आपला हा संघर्षमय प्रवास मांडला. ती म्हणाली, 'आता समाजात स्त्री-पुरुष समानतेसाठी फक्त चर्चा होत नाही, तर प्रत्यक्ष काम होत आहे, ते बघून खूप दिलासा मिळतो. एलजीबीटीक्यू (LGBTQ) म्हणजे समलिंगी, ट्रान्सजेन्डर असणारे लोक आता खुलेपणाने समाजापुढे येत आहेत. त्यांना सरकारी खात्यातील नोकरीबरोबरच घर, समाज भवन असे काही सरकारी लाभही मिळू लागले आहेत, पण समानतेसाठी अजून खूप काही करणं बाकी आहे.'
हे वाचा-रिअल लाइफ Pushpa गजाआड! रक्तचंदनाची तस्करी करणारे 55 मजुर आणि 3 तस्कर अटकेत
आपली कहाणी सांगताना विद्या म्हणाली, 'कोंडागाव जिल्ह्यातील फरासगाव इथं एका सर्वसामान्य कुटुंबात 1 मे 1977 रोजी माझा जन्म झाला. माझ्या आईनं मला जन्म दिला पण माझं अस्तित्व कधी स्वीकारलंच गेलं नाही. जेव्हा मी ठरवलं की मी जशी आहे तशीच जगणार आणि त्यासाठी लिंग परिवर्तन (Gender Change) करून मी स्वतःची ओळख निर्माण केली तेव्हा मी खऱ्या अर्थानं जगू लागले. माझा जन्म झाला तेव्हा समाजासाठी मी एक मुलगा होतो. त्याचं नाव होतं विकास राजपूत. वयाच्या 10 व्या वर्षापासूनच मला माझ्यातील वेगळेपणाची जाणीव झाली. माझं शरीर मुलाचं असलं तरी आतून मी स्वतःला मुलगी समजत होतो. मुलगा असूनही मुलीसारख्या हालचाली, वागणं बोलणं यामुळे कुटुंबाच्या आणि समाजाकडूनही माझी हेटाळणी, कुचेष्टा होत होती. मी घरच्यांशी अनेकदा माझ्या मनातलं बोललो, पण त्यांनी दुर्लक्षच केलं. आत्महत्या करण्याचाही विचार मनात आला. मात्र त्यानंतर मी निर्णय घेतला की, लिंग बदल शस्त्रक्रिया करून घेऊन मुलीचं रूप धारण करायचे. आत्म्याने मी मुलगी आहे तर शरीरानेही मुलगीच राहायचं.
हे वाचा-मॅट्रिमोनियल साईटवर पार्टनर शोधताय? प्रोफाइलची सत्यता कशी तपासाल?
शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी काम
मात्र या लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रकमेची गरज होती. माझ्या लहानपणीच माझ्या वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी स्वत: पैसे कमवण्याचा मी निर्णय घेतला आणि पुढील शिक्षणासाठी रायपूरला आले. इथं काही वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं. पैसे साठवले. यादरम्यान लिंग बदल शस्त्रक्रियेबाबत माहिती मिळवली. अखेर 2007 पासून लिंग बदलाची प्रक्रिया सुरू केली. 2020 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात चार शस्त्रक्रिया झाल्या.
'मला माझे शरीर सापडले'
जेव्हा मी माझी ही अत्यंत महत्त्वाची आणि अवघड शस्त्रक्रिया होत होती, तेव्हा माझ्यासोबत कोणीही नव्हते. खूप वेदना होत होत्या, पण सोबत कोणीही नव्हते, अर्थात त्या वेदनेतही मला माझं शरीर सापडल्याचा आनंद होता. मी स्वतः भेटले होते. आत्तापर्यंत मी दुसर्याच्या शरीरात वावरत होते, आता मला माझं शरीर मिळालं होतं. मी आता मला लहानपणापासूनच आवडणारे मुलींचे कपडे घालायला सुरुवात केली. शस्त्रक्रियेनंतर 2007 मध्ये, रायपूरमधील काही मुलांनी माझ्यावर काहीतरी टिप्पणी केली, मीही त्यांना उत्तर दिले. त्यावर त्या सगळ्यांनी मला मारहाण केली. याचा माझी आई सरोज सिंग हिला खूप त्रास झाला. तिची माझ्याबद्दलची काळजी इतकी वाढली की ती मानसिकदृष्ट्या कोसळून पडली आणि 2009 मध्ये ती हे जग सोडून गेली.
मी भाग्यवान आहे, मी वेगळी आहे
मी खूप संघर्ष केला, पण मी नशीबवान आहे, कारण मी इतरांपेक्षा वेगळी आहे कारण मी स्त्री आणि पुरुष दोघांचंही आयुष्य जगले आहे. सुरुवातीला घरच्यांनी मला कधीच साथ दिली नाही, पण आता माझी बहीण आणि तिची मुले माझ्यासोबत आहेत. आम्हाला तुझा अभिमान आहे, असं ते सांगतात. आता मला कुटुंबाकडून आणि समाजाकडूनही प्रेम, आदर मिळत आहे, अशी भावना विद्यानं व्यक्त केली.
हे वाचा-मंदिरात देवीच्या प्रतिमेसोबत तरुणाचं गैरवर्तन; दर्शन घेताना ग्रील ओलांडली आणि...
2009 पासून विद्या मितवा समिती ही संस्था चालवत असून, थर्ड जेंडर वेलफेअर बोर्डची सदस्य आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सरकारी आणि निमसरकारी संस्थांसाठी निमंत्रित प्रशिक्षक म्हणूनही काम करत आहे. भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्सच्या ड्रग अॅब्युज प्रिव्हेंशन प्रोग्राममधील मास्टर ट्रेनर आहे. ट्रान्सजेंडर समुदायाशी संबंधित कार्यक्रमासाठी NACO, HIV/AIDS शी निगडीत विद्याला आता अनेक मानसन्मान मिळाले असून राज्य सरकारतर्फे पंडित रविशंकर शुक्ल सन्मान 2021, अलायन्स इंडियाकडून राष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार 2018, शायनिंग स्टार्स, अनाम प्रेम, मुंबई महाराष्ट्र तर्फे पुरस्कार 2017 अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. स्वतःवर विश्वास ठेवून धडाडीनं निर्णय घेणाऱ्या विद्यानं स्वत: कुटुंब, समाजाशी संघर्ष करत स्वत:चं आयुष्य घडवलंच पण आपल्यासारख्या अनेकांची ती आधार झाली आहे. यामुळेच समाजात तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून, ती अनेकांसाठी प्रेरणा ठरली आहे. छत्तीसगड सरकारनं अधिकृत कॅलेंडरमध्ये ट्रान्सजेंडर पोलिसांना स्थान देऊन विद्याच्या कार्याचा उचित सन्मान केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.