नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी : कृषी कायदे (agriculture act 2020) रद्द करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनावर आपली रोखठोक भूमिका मांडली. 'विरोधकांनी जरूर विरोध करावा, पण शेतकऱ्यांना नवीन कायद्याबद्दल समजून सांगितले पाहिजे;, असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला. तसंच, आधी पाठिंबा दिला होता मग यू-टर्न का ? असा सवालही मोदींनी पवारांना विचारला.
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना कृषी कायदे आणि आंदोलकावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
'शेतकरी आंदोलनाची खूप चर्चा झाली आहे. कशाबद्दल हे आंदोलन आहे, त्याबद्दल चर्चा झाली नाही. शरद पवार यांनी शेती कायदे सुधार करण्यासाठी प्रयत्न केले होते. शरद पवार यांनी शेती कायद्यात सुधार करण्यास मत व्यक्त केले. पण त्यांनी कायद्याला विरोध केला नाही. आज आम्ही चांगले विचार मांडले याचा अर्थ असा नाही की, 10 वर्षानंतर चांगले विचार असू शकत नाही. पण अचानक आज त्यांनी यू-टर्न का घेतला हे मात्र कळू शकले नाही. तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा सांगू शकता की, नवीन कायदे आहे ते स्वीकारले पाहिजे' असा टोला मोदींनी शरद पवारांना लगावला.
त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणातील मुद्देच राज्यसभेत वाचून दाखवले. 'शेतकऱ्यांना पिक विकण्यासाठी स्वातंत्र्य, भारताला स्वतंत्र्य कृषी बाजार मिळवून देण्यासाठी मनमोहन सिंग यांनी सांगितले होते. आता त्यांनी जे सांगितले होते तेच आम्ही करत आहे. उलट तुम्हाला याबद्दल अभिमान वाटायला हवा होता', असा टोलाही मोदींनी लगावला.
'जे लोकं विरोध करत आहे, त्यांच्या राज्यात त्यांनी याच विधेयकातून काही ना काही केलेच आहे. एका घरात जेव्हा लग्न असते तेव्हा कुणी नाराज होत असतं, तसंच देश सुद्धा सर्वात मोठे कुटुंब आहे, कुणी ना कुणी नाराज होतच राहिल', अशी फटकेबाजीही मोदींनी केली.
'आज जे काही माझ्याविरोधात बोलले जात होते, तेव्हा सुद्धा डावे हे काँग्रेस सरकारविरोधात बोलत होते, त्यामुळे माझ्या वाट्याला ज्या काही शिव्या येतील त्या येऊ द्या, तुम्ही श्रेय घ्या', अशी टोलेबाजीही मोदींनी केली.
'कृषीमंत्री तोमर हे शेतकऱ्यांशी बोलत आहे, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजून कोणताही तणाव निर्माण झालेला नाही. आंदोलन करणे तुमचा हक्क आहे, पण वयोवृद्ध शेतकऱ्यांनी तिथे बसवणे योग्य नाही. तुम्ही आंदोलन मागे घेतल्यानंतर सुद्धा चर्चा करू शकता. चर्चा करण्यासाठी मी राज्यसभेच्या माध्यमातून निमंत्रण देत आहो. चर्चेतूनच मार्ग सुटणार आहे, असं आवाहनही मोदींनी केले.
तसंच, एमएसपी आहे, एमएसपी कायम राहणार आहे. देशातील लोकांना स्वस्त धान्य दिले जात आहे, ते कायम राहणार आहे,असंही त्यांनी ठामपणे सांगितले.
ममतादीदींवर निशाणा
'आम्ही छोट्या शेतकऱ्यांसाठी 90 हजार कोटी फायदा मिळवून दिला आहे, हा आकडा कर्जमाफीपेक्षा सुद्धा जास्त आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना फायदा मिळवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचे ठरवले आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा थेट फायदा झाला आहे. तसंच 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात किसान जीवन विमा योजनेतून थेट पैसे जमा केले आहे. बंगालमध्ये राजकारण झाले नसते तर तेथील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले असते, असं म्हणत मोदींनी ममतादीदींवर निशाणा साधला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi News, Farmer protest, Narendra modi, Pm in rajyasabha, Rajya sabha, Sharad pawar