कारगिल, 24 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. यावेळी ते म्हणाले की, भारताने नेहमीच युद्धाकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहिले आहे. पण, देशावर वाईट नजर ठेवणाऱ्या कोणालाही चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद आणि रणनीती भारताच्या सशस्त्र दलांकडे आहे. कारगिल येथे सशस्त्र दलांना संबोधित करताना, मोदींनी 1999 मध्ये कारगिल संघर्षानंतर सीमावर्ती भागाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली, जेव्हा भारतीय सैन्याने “दहशतवादाचा खात्मा केला होता”. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी - ते म्हणाले, “पाकिस्तानसोबत असे कोणतेच युद्ध झाले नाही, जेव्हा कारगिलवर विजयाचा झेंडा फडकवला गेला नाही”. दिवाळी हा “दहशतवादाच्या अंताचा उत्सव” आहे. मी कारगिल युद्ध जवळून पाहिले आहे. त्यावेळी मला कर्तव्यच कारगिलला घेऊन आले होते. त्यावेळच्या अनेक आठवणी आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज कारगिल येथे भेट देत प्रत्येक वर्षी देशाच्या सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली. महिलांचा समावेश करुन सुधारणांची अंमलबजावणी - पीएम मोदी म्हणाले, “आमच्या सशस्त्र दलांनी कारगिलमध्ये दहशतवादाचा नाश केला होता आणि त्या वेळी साजरी केलेली दिवाळी लोकांना अजूनही आठवते.” मी पायाभूत सुविधांचा विकास आणि सैन्यात महिलांचा समावेश करून सशस्त्र दलांमध्ये सुधारणा लागू करण्यावर काम केले आहे. “सशस्त्र दलांमध्ये महिलांचा समावेश केल्याने आमची ताकद वाढेल.” सशस्त्र दलात अनेक दशकांपासून आवश्यक असलेल्या सुधारणा आता लागू केल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. हेही वाचा - Diwali Special : आज मुलीला द्या खास गिफ्ट, वयाच्या 21 व्या वर्षी मिळतील पूर्ण 64 लाख रुपये सीमा सुरक्षित तर देश सुरक्षित - पंतप्रधान म्हणाले की, देश तेव्हाच सुरक्षित असतो जेव्हा त्याच्या सीमा सुरक्षित असतात, अर्थव्यवस्था मजबूत असते आणि समाज आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो. भारत आपल्या बाह्य आणि अंतर्गत दोन्ही शत्रूंचा पूर्ण ताकदीने सामना करत आहे. देशातून ‘दहशतवाद, नक्षलवाद आणि कट्टरतावाद’ समूळ उखडून टाकण्यासाठी उचललेल्या पावलांचीही माहिती त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.