Home /News /national /

जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान म्हणाले, 'तुमच्या पूर्वजांनी जगलं तसं आयुष्य तुमच्या वाट्याला मी येऊ देणार नाही'

जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान म्हणाले, 'तुमच्या पूर्वजांनी जगलं तसं आयुष्य तुमच्या वाट्याला मी येऊ देणार नाही'

PM Modi J&K Visit: पीएम मोदी म्हणाले, 'एकेकाळी सरकारी फाईल दिल्लीतून निघत असे, ती जम्मू-काश्मीरला पोहोचायला 2-3 आठवडे लागायचे. मला आनंद आहे की, आज 500 किलोवॅटचा सौरऊर्जा प्रकल्प अवघ्या 3 आठवड्यांत कार्यान्वित झाला आहे'.

  जम्मू, 24 एप्रिल : रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला 20 हजार कोटींचे प्रकल्प भेट दिले. ऑगस्ट 2019 मध्ये, पंतप्रधान मोदींनी येथून आर्टिकल 370 हटवल्यानंतर प्रथमच काश्मीर खोऱ्याला भेट दिली. या वेळी, ते म्हणाले की, गेल्या 2-3 वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे नवे आयाम प्रस्थापित झाले. यावेळी मोदींनी 3100 कोटींहून अधिक खर्चून बांधलेल्या बनिहाल काझीगुंड रोड बोगद्याचं उद्घाटन केलं. पल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी 500 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटनही केलं. यामुळे ही कार्बन न्यूट्रल बनणारी देशातील पहिली पंचायत बनली. सांबा येथील पंचायती राज दिन सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, तुमचे पूर्वज जे आयुष्य जगले, ते आयुष्य तुमच्या वाट्याला मी येऊ देणार नाही. नजर टाकूया पंतप्रधान मोदींच्या भाषणातल्या 10 ठळक मुद्द्यांवर..
  1. पंतप्रधान म्हणाले, 'मला जम्मू-काश्मीरच्या तरुणांना सांगायचंय की, तुमचे आई-वडील, आजी-आजोबा यांना ज्या त्रासाला सामोरं जावं लागलं, तसं जीवन तुम्हाला कधीच जगावं लागणार नाही. मी हे तुम्हाला करून दाखवेन.
  2. पंतप्रधान म्हणाले - स्वातंत्र्याच्या अमृत काळात म्हणजे 25 वर्षांत नवीन जम्मू-काश्मीर विकासाची नवी गाथा लिहील. स्वातंत्र्याच्या 7 दशकांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये केवळ 17,000 कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक झाली. गेल्या दोन वर्षांत हा आकडा 38,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  3. केंद्र सरकारच्या योजना आता येथे वेगाने राबविल्या जात असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्याचा थेट फायदा जम्मू-काश्मीरमधील गावांना होत आहे. वीज कनेक्शन असो, पाण्याचं कनेक्शन असो, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयं असो, जम्मू-काश्मीरला त्याचा मोठा फायदा झाला आहे.
  4. पीएम म्हणाले, 'वाल्मिकी समाजाच्या पायांमध्ये अनेक दशकांपासून ज्या बेड्या घालण्यात आल्या होत्या, त्यातून त्यांची मुक्तता झाली आहे. आज प्रत्येक समाजातील मुलं-मुली आपली स्वप्नं पूर्ण करण्यास सक्षम आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता, त्यांनाही आता आरक्षणाचा लाभ मिळत आहे.
  5. पीएम मोदी म्हणाले, 'गेल्या 2-3 वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे नवे आयाम प्रस्थापित झाले आहेत. केंद्राचे सुमारे पावणेदोनशे कायदे इथे लागू होत नव्हते. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी आम्ही ते कायदे लागू केले.
  6. पंतप्रधान म्हणाले - यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये पंचायती राज दिन साजरा होणं हे एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे.
  7. मोदी म्हणाले, 'ना ही जमीन माझ्यासाठी नवीन आहे, ना मी तुमच्यासाठी नवीन आहे. मला अनेक वर्षांपासून येथील बारकावे माहीत आहेत. माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की, आज इथे कनेक्टिव्हिटी आणि विजेशी संबंधित 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे.
  8. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'वोकल फॉर लोकल या मंत्रात भारताचा विकास दडलेला आहे. भारताच्या लोकशाहीच्या विकासाची ताकद देखील स्थानिक प्रशासन आहे. तुमच्या कार्याची व्याप्ती स्थानिक असू शकते. परंतु, त्याचा सामूहिक प्रभाव जागतिक असेल. ही शक्ती ओळखा.
  9. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पंचायती राज व्यवस्थेत भगिनींचा सहभाग वाढवण्यावर आमच्या सरकारचाही भर आहे. भारताच्या कन्या काय करू शकतात, हे कोरोनाच्या काळात भारताच्या अनुभवाने जगाला खूप काही शिकवले आहे. ग्राम पंचायतींना सर्वांना बरोबर घेऊन आणखी एक काम करायचे आहे. कुपोषण आणि अशक्तपणापासून (anemia) देशाला वाचवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराबद्दल लोकांना जागरुक केले पाहिजे.
  10. पंतप्रधान म्हणाले, 'स्वातंत्र्याचा हा अमृत भारताचा सुवर्णकाळ असणार आहे. सर्वांच्या प्रयत्नातून हा संकल्प सिद्ध होणार आहे. यामध्ये लोकशाहीतील सर्वात तळागाळातील घटकाची, ग्रामपंचायतीची, तुम्हा सर्वांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Jammu and kashmir, Jammu kashmir, Pm modi, Pm modi speech

  पुढील बातम्या