हर्षिल सक्सेना, प्रतिनिधी बारा, 15 जून : लग्न साधारणतः दोन व्यक्तींचं होतं. दिवाळीत तुळशीचं लग्नही थाटामाटात साजरं केलं जातं. अलीकडेच आपण स्वतः स्वतःशीच लग्न केल्याची प्रकरणंही पाहिली आहेत. मात्र राजस्थानच्या बारा जिल्ह्यातून तर चक्क वड आणि पिंपळाचं लग्न पार पडल्याची बातमी समोर आली आहे. हे लग्न अगदी विधिवत आणि नातेवाईकांच्या साक्षीने पार पडलं. बारा जिल्ह्याच्या अटरू येथील ढोक तलाई स्टेडियममध्ये या अनोख्या वृक्ष विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या विवाहसोहळ्यासाठी निमंत्रण पत्रिका छापून नातेवाईकांना बोलवण्यात आलं आणि दूर-दूरचे नातेवाईक या सोहळ्यात सहभागी झालेदेखील होते.
अटरू भागातील रहिवासी अंकुर प्रजापती यांच्या कुटुंबीयांनी हे वड-पिंपळाचं लग्न आयोजित केलं होतं. अंकुर यांचं कुटुंब जवळपास 20 वर्षांपासून ढोक तलाई स्टेडियममध्ये राहत आहे. 15 वर्षांपूर्वी याठिकाणी अंकुरच्या पालकांनी एक पिंपळाचं आणि एक वडाचं झाड लावलं. या झाडांना त्यांनी आपल्या कुटुंबियांपैकी एक मानलं होतं. त्यांचं पालनपोषणही खूप जिव्हाळ्याने केलं. स्टेडियमच्या हद्दीतील बांधकामादरम्यान त्यांनी ही दोन झाडं तोडून दिली नाहीत. शिवाय आता ती तारुण्यात आल्यावर प्रजापती कुटुंबियांनी त्यांचं एकमेकांशी लग्न लावून द्यायचं ठरवलं. Vastu: घरात पोपट, कासव येणं, मुंग्या निघणं शुभ मानावं की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं या सोहळ्यात मेहंदी, हळद असे सर्व साग्रसंगीत कार्यक्रम पार पडले. तर पुजारी महेंद्र भट्ट यांनी सप्तपदी म्हणून दोन्ही झाडांचं लग्न लावलं. शेकडो लोक या लग्नाचे साक्षीदार झाले. खरंतर झाडांचं लग्न पाहून गावकरी आश्चर्यचकीत झाले नाहीत, तर ही परंपरा आपण सर्वजण उत्साहात साजरी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ही परंपरा साजरी करण्याचा उद्देश पर्यावरण जागृती हा आहे. सध्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे ‘झाडं लावा, झाडं जगवा’, याबाबत जनजागृती करण्यासाठी ही परंपरा असल्याचं त्यांनी सांगितलं.