जुगल कलाल, प्रतिनिधी डुंगरपूर, 18 जून : प्राणिमात्रांना जीव लावला की ते आपल्या घरातीलच एक असल्यासारखे वाटू लागतात. अनेक उदार माणसं तर रस्त्यात एखादा प्राणी किंवा पक्षी अडचणीत दिसला की त्याच्या मदतीला धावून जातात. राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या मोराला पाच दिवस झुंज देऊन गावकऱ्यांच्या मदतीने वनविभागाने बाहेर काढलं. जिल्ह्यातील धंबोला गावात कुवाडिया फला येथे ही विहीर आहे. या विहिरीचं पाणी आटलेलं असून आकाराने ती अरुंद आहे. त्यामुळे दिसायला ती एखाद्या खोल खड्ड्यासारखी दिसते. याच खड्ड्याचा अंदाज न आल्याने मोर त्यात खोलवर पडला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, मोर विहिरीत खोलवर पडल्यानंतर बाहेर निघण्यासाठी प्रचंड धडपडत होता, जिवाच्या आकांताने ओरडून मदत मागत होता. सुदैवाने तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला मोर विहिरीत पडल्याचं कळलं आणि त्यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी त्वरित वनविभागाला याबाबत कळवलं. Weather Update Today : कुठे पावसाची शक्यता तर कुठे उन्हाचा कडाका, चेक करा नागपूरसह 6 शहरांचं तापमान त्यानंतर तातडीने वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यापूर्वीच तिथे संपूर्ण गाव गोळा झाला होता. वनविभागाच्या पथकालाही मोराला बाहेर काढण्यात अपयश आलं. तब्बल पाच दिवसांच्या प्रयत्नांनंतर दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरून मोराला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. हे पाच दिवस मोरासाठी अतिशय धोक्याचे होते. सतत मोराच्या रडण्याचे, ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते. गावकरीही हळहळले. त्यांनादेखील पाच दिवस झोप लागली नाही. विहिरीतून बाहेर आल्यावर भांबावलेल्या मोराला पूर्ववत व्हायला दोन तास मोकळेपणाने फिरू दिलं. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्याला सुखरूपपणे जंगलात सोडलं. दरम्यान, मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे.