शशिकांत ओझा, प्रतिनिधी पलामू, 29 जुलै : असं म्हणतात की, माणूस आपल्या पदाने नाही तर कामाने, विचारांनी मोठा होतो. आयएएस अधिकारी आंजनेयुलु दोड्डे हे झारखंडमध्ये पलामू जिल्ह्याचे उपयुक्त म्हणून कार्यरत होते. अलीकडेच त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली. त्यांच्या कामाची शैली इतकी वेगळी आहे की, लोक त्यांच्याकडे केवळ एक अधिकारी म्हणून नाही, तर एक चांगली व्यक्ती म्हणून पाहतात. त्यांची बदली झाली तेव्हा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी चक्क शिपायाच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. जिल्ह्यात याबाबत मोठी चर्चा आहे. आंजनेयुलु दोड्डे म्हणाले की, ‘माझे वडीलही सेवक म्हणून काम करायचे, नंद लालजी माझ्या वडिलांसारखेच आहेत. त्यांनी माझी वडिलांसारखीच काळजी घेतली’, अशा भावना व्यक्त करून त्यांनी त्यांच्या कार्यालयातील तीनही शिपायांचा शाल देऊन सत्कार केला. आंजनेयुलु दोड्डे आता दुमला जिल्ह्याचा उपायुक्त म्हणून कार्यभार सांभाळतील.
दोड्डे यांनी या कार्यक्रमात पलामूमध्ये काम करताना आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं. जिल्हा प्रशासनाच्या कामाचं कौतुकही केलं. तसेच पलामूचे नवे उपयुक्त शशी रंजन हेदेखील यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘मी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेन. जिल्ह्याचा आणखी विकास करण्यासाठी काम करेन.’ दरम्यान, यावेळी अनेक जिल्हा प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.