इटावा, 13 जुलै : देशात सध्या ज्योती मौर्य, आलोक मौर्य प्रकरण चांगलंच गाजतंय. कोणी ज्योती यांची बाजू घेतंय, तर कोणी आलोक यांच्या बाजूने बोलतंय, मात्र या प्रकरणाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. अशातच उत्तर प्रदेशातून आणखी एका जोडप्याची बातमी समोर आली आहे. जी ज्योती मौर्य यांच्यासारखी अजिबात नाही. आपल्या भारतात स्त्रिया नवऱ्याला परमेश्वर मानतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. उत्तर प्रदेशच्या एका महिलेने आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईच्या तावडीतून सोडवून आणलं, तेही रीतसर पोलीस मदतीने. ‘माझा नवरा कसाही असला तरी तो माझ्याजवळ परत आला हे महत्त्वाचं आहे’, असं म्हणत तिने पोलिसांचे आभारही मानले. ही घटना इटावा जिल्ह्यातली असून चार दिवसांत येतो असं सांगून या महिलेचा नवरा बेपत्ता झाला होता. महिलेने त्याला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेर, तो नोएडात एका महिलेसोबत राहतोय, असं कळल्यावर महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही तातडीने तपास करून महिलेच्या नवऱ्याला तिच्याकडे सुपूर्द केलं आणि आता सुखाने संसार करा, एकमेकांना समजून घ्या, असा सल्ला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये राहणाऱ्या शिवानी चौरसिया यांचं 14 एप्रिल 2022 रोजी इटावाच्या शिवम चौरसिया यांच्याशी लग्न झालं होतं. दोघं उमरसेंडा गावात गोडीगुलाबीने राहत होते. मात्र असं असताना लग्नाला वर्ष होताच 19 एप्रिल 2023 रोजी शिवम बेपत्ता झाला. त्याने बायकोला मी चार दिवसांत घरी येतो असं सांगितलं होतं. मात्र आठ दिवस, पंधरा दिवस होऊनही नवरा घरी न आल्याने शिवानी यांचा जीव कासावीस झाला. आपला नवरा सुखरूप असेल ना, या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या. त्याला शोधण्यासाठी त्यांनी नातेवाईकांना फोन केले, आजूबाजूला चौकशी केली, शक्य तितके सर्व प्रयत्न केले, मात्र शिवमचा काही पत्ता लागला नाही. इतक्यातच त्यांना आपला नवरा एका महिलेसोबत नोएडात राहत असल्याची कुणकुण लागली. आता त्यांच्या तळपायातली आग मस्तकात गेली. त्यांनी थेट पोलीस तक्रार करायचं ठरवलं. मराठमोळ्या अभिनेत्याने 57 व्या वर्षी केलं सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न; पत्नी आहे 25 वर्षांनी लहान PHOTOS शिवानी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवम नोएडात सिक्युरिटी गार्डचं काम करत असतानाच त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांचीही बाजू पोलिसांनी ऐकली. त्यावेळी शिवानी यांनी शिवमला शोधल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले, तर शिवमने सांगितलं, ‘ही माझ्यासोबत नोएडाला यायला तयार नव्हती म्हणून मी एकटाच निघून गेलो.’ दरम्यान, या दोघांच्या बोलण्यात त्यांचीच नातेवाईक असलेल्या एका महिलेचा वारंवार उल्लेख येत होता. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांचं हे प्रकरण असू शकतं, असं पोलिसांच्या लक्षात आलं. मात्र पोलिसांनी दोघांचंही समुपदेशन करून त्यांना सुखाचा संसार करण्याचा सल्ला दिला.