नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : सात ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सरकारचे प्रमुख या नात्याने राजकारणातली 20 वर्षं पूर्ण केली. आम्ही गुजरातवासीयांनी नरेंद्र मोदी यांचा उदय आणि त्यांनी राज्याची दिशा कशी बदलली हे जवळून पाहिलं आहे. बऱ्याचदा असं विचारलं जातं, की अशी कोणती गोष्ट आहे जी मोदींचं वेगळेपण दर्शवते. माझ्या मते, कोणतंही काम असो किंवा वैयक्तिक संवाद असो, त्याला मानवी, संवेदनशील स्पर्श म्हणजेच ह्युमन टच देणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच मोदींनी आज इतकी उंची गाठली आहे. 1980चं दशक गुजरातच्या राजकारणासाठी इंटरेस्टिंग होतं. केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस (Congress) पक्ष सत्तापदी अगदी आरामात विराजमान झाला होता. कमकुवत प्रशासन, पक्षांतर्गत कटुतेमुळे माजलेल्या दुफळ्या आणि चुकीचे प्राधान्यक्रम असं असूनही अन्य कोणताही राजकीय पक्ष सत्तेत येऊ शकतो, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. अगदी कट्टर भाजपसमर्थक (BJP) आणि भाजप कार्यकर्तेही त्याबद्दल साशंकच होते. आरएसएसमधून राजकारणात प्रवेश अशा कालखंडात नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून (RSS) भारतीय जनता पक्षातून राजकीय जीवनात प्रवेश केला. अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाची तयारी करण्याचं आव्हान मोदींनी स्वीकारलं. या दृष्टीने त्यांनी सर्वांत पहिल्यांदा उचललेल्या पावलांपैकी पहिलं पाऊल म्हणजे प्रोफेशनल्सना भारतीय जनता पक्षाशी जोडून घेणं. पक्षाने प्रसिद्ध डॉक्टर्स, वकील, इंजिनीअर्स, शिक्षक यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना निवडणुकीच्या, तसंच राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घ्यायला सुरुवात केली. तसंच, केवळ राजकारणापेक्षा नरेंद्र मोदी यांनी गव्हर्नन्स अर्थात प्रशासनाबद्दल बोलायला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केली. नागरिकांचं जीवनमान उंचावणं आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याच्या नावीन्यपूर्ण मार्गांचा त्यांनी सातत्याने विचार केला. वाचा : उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधींची मोठी घोषणा एक संवादक म्हणून नरेंद्र मोदींचं कर्तृत्व उत्तम होतं आणि त्याहीपेक्षा अधिक ते चांगले मोटिव्हेटरही (Motivator) होते. अहमदाबादमधल्या धरणीधर इथल्या निर्मल पार्टी प्लॉटवरच्या एक छोट्या सभेसमोर त्यांनी केलेलं एक भाषण मला आठवतं आहे. पहिली काही मिनिटं त्यांनी आपल्या खास शैलीतल्या टिप्पण्यांनी सगळ्यांना हसवलं. ते त्यांचं वैशिष्ट्यच होतं; पण त्यानंतर त्यांनी गर्दीला प्रश्न विचारला, की आपण असेच थट्टा-विनोद करत राहू या की देशहिताच्या मुद्द्यांबद्दल बोलू या? माझ्यात त्या वेळी हे धैर्य कुठून आलं माहिती नाही, पण मी ओरडलो, ‘दोन्ही!’ माझं उत्तर ऐकून ते माझ्याकडे वळून म्हणाले, ‘नाही. आपण दोन्ही गोष्टी एका वेळी करू शकत नाही.’ त्यानंतर त्यांनी त्या वेळी केलेल्या भाषणात भाजपचा गव्हर्नन्सबद्दलचा (Governence) दृष्टिकोन, कलम 370, शाह बानो प्रकरण आणि अन्य काही गोष्टींबद्दल विस्ताराने आपले विचार मांडले. त्यांच्या विचारांतल्या स्पष्टतेने मला मंत्रमुग्ध केलं. मोदींच्या भाषणाची लोकप्रियता गुजरातच्या बाहेरच्यांना कदाचित माहिती नसेल; पण 1990च्या दशकाच्या सुरुवातीला मोदींच्या भाषणांच्या कॅसेट्स गुजरातच्या शहरी भागांमध्ये बऱ्याच लोकप्रिय होत्या. त्या कॅसेट्समध्ये नरेंद्र मोदींनी राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये केलेल्या भाषणांचे वेगवेगळे भाग रेकॉर्ड केलेले असायचे. वाचा : महिला उमेदवाराच्या केसात सापडला मंत्र्याचा हरवलेला चश्मा लातूर भूकंपानंतर मोदींचं भाषण महाराष्ट्रात लातूरमध्ये 1994 साली झालेल्या भूकंपानंतर त्यांनी केलेलं भाषण काळजाला हात घालणारं होतं. अहमदाबादमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातून काही स्वयंसेवक आणि मदत साहित्य लातूरला पाठवलं जाणार होतं. त्यावेळी नरेंद्र मोदींनी उत्स्फूर्त भाषण केलं होतं. ते भाषण ऐकल्यानंतर किमान 50 जणांनी असं सांगितलं, की मोदींच्या शब्दांचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव पडला असून, त्यांना आत्ता तातडीने लातूरला जायचं आहे. मोदींनी त्यांना त्यापासून परावृत्त केलं आणि सांगितलं, की अनेक जणांनी तिथे जाण्यापेक्षा मदत तिथे पोहोचणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी तिथे जाण्यापेक्षा जिथे आहोत तिथून देशसेवा करणं जास्त महत्त्वाचं आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी जोडून घेण्याची हातोटी नरेंद्र मोदींकडे आहे. म्हणूनच त्यांचा समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांशी संपर्क आहे. 2013-2014मध्ये त्यांचा ‘चाय पे चर्चा’ (Chai Pe Charcha) उपक्रम जगाने पाहिला; पण मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसोबत संवाद साधून कपभर चहाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या नागरिकांशी दृढ केलेले बंध मी विसरू शकत नाही. 1990च्या दशकात मी त्यांना अहमदाबादमधल्या प्रसिद्ध पिरामल गार्डनमध्ये भेटलो. तिथे ते मॉर्निंग वॉकर्सच्या गटासमोर भाषण करत होते. त्यांचे त्यांच्याशी असलेले चांगले संबंध मी अगदी सहजपणे पाहू शकत होतो. ओळखीच्या एका डॉक्टरनी मला सांगितलं, की नरेंद्र भाईंचे अशा प्रकारचे संवाद चालू घडामोडी समजून घेण्यासाठी त्यांना खूप उपयोगी पडतात. मोदींची संवेदनशीलता सांगणारे दोन अनुभव नरेंद्र मोदींची संवेदनशीलता सांगणारे दोन अनुभव सांगतो. 2000च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात इतिहासकार रिझवान काद्री आणि मी, प्रसिद्ध गुजराती साहित्यिक आणि संघपरिवारातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व असलेल्या केकाशास्त्रींच्या (KekaShastri) कार्याचं डॉक्युमेंटेशन करत होतो. आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो आणि तेव्हा त्यांची प्रकृती खालावल्याचं माझ्या लक्षात आलं. मी त्यांचा फोटो टिपला आणि नरेंद्र मोदींच्या कार्यालयात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर लवकरच केकाशास्त्रींच्या सेवेसाठी एका नर्सची व्यवस्था करण्यात आली. दुसरी आठवण लेखक प्रियकांत पारीख (Priyakant Parikh) यांच्याशी निगडित आहे. त्यांचं 100वं पुस्तक नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित व्हावं, अशी त्यांची तीव्र इच्छा होती; मात्र त्यात एक अडचण होती, की एका मोठ्या अपघातामुळे त्यांना अपंगत्व आलं होतं आणि ते घरातून बाहेर पडू शकत नव्हते. अशा स्थितीत आश्रम रोडवरच्या प्रियकांत पारीख यांच्या घरी जाऊन त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मला आठवतात. राज्याचे मुख्यमंत्री एका आजारी लेखकाच्या घरी जाऊन त्याचं पुस्तक प्रकाशित करतात, ही गोष्ट गुजराती साहित्यिक वर्तुळाला थक्क करणारी होती. वाचा : ‘माझे वडील काही झूमधले प्राणी नाहीत’,माजी PM मनमोहन सिंग यांची मुलगी आरोग्य मंत्र्यावर संतापली समोरच्याचं उत्तम रीतीने ऐकून घेण्याचं कौशल्य आणि तंत्रज्ञानाबद्दल असलेलं प्रेम या गोष्टी प्रत्येक राजकीय नेत्याला उपयोगी पडू शकतात आणि नरेंद्र मोदींचं हेच वैशिष्ट्य आहे. अर्थात, फोन नंबर्स लक्षात ठेवण्याची कला तंत्रज्ञानामुळे नाहीशी होत असल्याचं दुःखही त्यांना आहे. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत पक्ष कार्यकर्ते हे त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे राहिले आहेत. त्यांना महत्त्वाकांक्षा नाहीत. नरेंद्र मोदी यांना पक्षाच्या धोरणाचं समन्वयन करण्याचं काम दिल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून विधानसभा, लोकसभेपर्यंतची एकही निवडणूक पक्ष हरला नाही, यात काही आश्चर्य नाही. भारतीय जनता पक्षाला 2000 साली निवडणुकीत फटका बसला आणि तेव्हा नरेंद्र मोदी राज्याबाहेर होते. पत्रकार म्हणून आम्हाला अनेक व्यक्तींना भेटावं लागतं; पण मी तरुण रिपोर्टर होतो, तेव्हा नरेंद्र मोदींनी मला सांगितलं होतं, की ही व्यावहारिक नाती असू नयेत, तर आयुष्यभर टिकणारे बंध असावेत. 1998 साली होळीच्या दरम्यान मी दिल्लीत होतो. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही. ‘तुमच्या टेलिफोन डायरीत 5000 नंबर्स हवेत. त्यांना तुम्ही एकदा तरी भेटलेलं असलं पाहिजे आणि तेही केवळ औपचारिकरीत्या नव्हे. तुम्ही त्यांना केवळ एक सोर्स म्हणून ओळखू नये, तर एक चांगली ओळखीची व्यक्ती किंवा मित्र म्हणून ओळखावं.’ नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे मी 5000 व्यक्तींना भेटलेलो नाही; पण मानवी संवेदनशीलतेच्या स्पर्शाचं महत्त्व किती आहे, हे मला त्यातून कळलं. नरेंद्र मोदी यांच्याकडे तो ह्युमन टच मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच ते इतके यशस्वी आहेत. - जपन पाठक (अहमदाबादमधील पत्रकार)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.