नवी दिल्ली 28 सप्टेंबर : कलेला जात-धर्म-पंथांच्या चौकटीत बांधून ठेवता येत नाही. केरळमधल्या (Kerala) कोळीकोड इथल्या एका तरुण मुस्लिम चित्रकार महिलेनं (Muslim Woman) ही गोष्ट खरी करून दाखवली आहे. जस्ना सलीम (Jasna Salim) असं नाव असलेल्या या महिलेनं श्रीकृष्णाचं एक चित्र रेखाटून मंदिरात श्रीकृष्णचरणी अर्पण केलं आहे. आपल्या हातून साकारलेलं श्रीकृष्णाचं चित्र (Balkrishna Painting) एखाद्या मंदिरात श्रीकृष्णासमोर अर्पण करण्याचं तिचं स्वप्न होतं. पांडलममधल्या उलानाडू श्रीकृष्ण स्वामी मंदिरात तिची ही इच्छा पूर्ण झाली. या 28 वर्षांच्या महिला कलाकारानं आपली कलाकृती रविवारी (26 सप्टेंबर) मंदिरात सादर केली. हा आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नसल्याचं तिने सांगितलं. कलाकृती सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मंदिर प्रशासनाचे तिने आभारही मानले आहेत. 'दी न्यू इंडियन एक्सप्रेस'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कोळीकोडमध्ये (Kozhikode) राहणाऱ्या जस्ना यांनी गेल्या काही वर्षांत काढलेल्या भगवान कृष्णाच्या चित्रांनी अनेकांचं लक्ष वेधलं होतं. गेल्या सहा वर्षांत त्यांनी बाळकृष्णाची 500हून अधिक चित्रं रेखाटली आहेत; मात्र आतापर्यंत मंदिरात देवासमोर ते सादर करण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी जस्ना यांनी रेखाटलेली कृष्णाची चित्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मडक्यातलं लोणी खातानाचा बाळकृष्ण त्या चित्रात रेखाटलेला होता. ते चित्र पाहून भक्तांच्या एका गटानं जस्ना यांच्याशी संपर्क साधला आणि मंदिरात भेट देण्यासाठी कृष्णप्रतिमा रेखाटण्याची विनंती केली. या भक्तांच्या विनंतीमुळेच आपल्याला उलानाडू श्रीकृष्ण (Ulanadu Shrikrishna Swamy Temple) स्वामी मंदिराला चित्राची भेट देता आली, असं जस्ना यांनी सांगितलं.
हरियाणातील सुलतान रेड्याचा दुर्देवी अंत;21 कोटींमध्ये विकण्याची केली होती मागणी
दोन मुलांची आई असलेल्या जस्ना यांनी चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. शालेय जीवनातसुद्धा त्यांची चित्रकला विशेष चांगली नव्हती. जेव्हा शिक्षक नकाशा काढायला सांगायचे तेव्हासुद्धा हात थरथरायचे. घराचं बांधकाम सुरू असताना त्यांनी काही जुने पेपर्स आणले होते. त्यातल्या एकावर असलेल्या श्रीकृष्णाच्या एका चित्रानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. 'आम्हा तीन बहिणींपैकी मी सर्वांत लहान. माझे आई-वडील लहानपणी मला प्रेमानं 'कान्ना' म्हणायचे. कृष्णाला कान्हा म्हणतात. त्यामुळेच मी जेव्हा पहिल्यांदा कृष्णाचं चित्र पाहिलं तेव्हा आपोआप मी त्याकडे आकर्षित झाले आणि मला ते चित्र रेखाटण्याची ऊर्मी निर्माण झाली. त्यामुळे मी कृष्णाचं चित्र काढलं आणि एका हिंदू मैत्रिणीला ते भेट दिलं,' असं जस्ना यांनी सांगितलं.
View this post on Instagram
त्यांनी आपलं हे पहिलं चित्र भेट दिलेल्या मैत्रिणीच्या कुटुंबानं त्यांचं कौतुक केलं. त्यांच्या घरात ते चित्र लावल्यापासून काही चांगले बदल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यातून त्यांना आणखी चित्रं रेखाटण्याची प्रेरणा मिळाली. आतापर्यंत विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींनी त्यांच्याकडून बाळकृष्णाची चित्रं रेखाटून घेतली आहेत.
'Amazon म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी 2.0', संघाच्या मुखपत्रातून अमेरिकी कंपनीवर टीका
'मी गेल्या सहा वर्षांपासून भगवान श्रीकृष्णाची चित्रं विष्णू आणि श्रीकृष्ण जयंती उत्सवाच्या वेळी गुरुवायूर मंदिराला पाठवत होते,' असंही त्यांनी सांगितलं. एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींना भगवान कृष्णाचं चित्र भेट देण्याची इच्छाही जस्ना यांनी व्यक्त केली आहे. लोणी खातानाचा बाळकृष्ण एवढं एकच चित्र आपण उत्तम पद्धतीने चितारू शकत असल्याचंही जस्ना यांनी आवर्जून सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.