आग्रा, 3 मार्च: गेली वीस वर्षं विष्णू तिवारी तुरुंगात खडी फोडत आहे, एका न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगत आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान द्यायला हाताशी पैसा नाही, ओळख नाही, वकील नाही... कितीही ओरडून मी बलात्कार केलेला नाही (Man Not guilty after 20 years in jail), असं सांगूनही काही उपयोग झाला नाही. बलात्काराच्या आरोपाखाली त्याला जन्मठेप झाली, तेव्ही विष्णू 23 वर्षांचा होता. आता दोन दशकं जेलची हवा खावून तो निर्दोष (Man innocent in rape case after 20 years in jail) मुक्त होणार आहे. पण दरम्यान त्यांचं सारं कुटुंब नेस्तनाबूत झालं आहे. हातात पैसा, ओळख नसेल तर स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करायला कसा आणि किती वेळ लागतो, याची साक्षच विष्णू देतो आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात बातमी दिली आहे. या सगळ्याची सुरुवात झाली 2000 साली. तेव्हा विष्णू वडील आणि दोन भावांबरोबर उत्तर प्रदेशातल्या ललितपूर (Uttar Pradesh news) गावात राहायचा. शिक्षण बेताचं, शाळा पूर्ण केली नव्हती. पण विष्णू वडील आणि भावांना मदत म्हणून छोटी-मोठी नोकरी करत जगत होता. गावापासून 30 किमी अंतरावरच्या दुसऱ्या गावातल्या एका SC महिलेनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवला. खटला दाखल झाला. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केला म्हणून त्याला ट्रायल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आपण निर्दोष असल्याचंं विष्णू सांगत राहिला, पण ते सिद्ध करण्यासाठी कोर्टापुढे पुरावे सादर करू शकला नाही. वकील नेमू शकला नाही.
हे वाचा - 'आम्हाला मुलगा मिळाला, अजून काही नको' शबनमचं मूल दत्तक घेणाऱ्या दांपत्याची गोष्ट
आपल्याला कोर्टाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करायचं आहे, असं तो म्हणाला. 2003 मध्ये त्याची आग्र्याच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली. दोन वर्षांत त्याने कसेबसे पैसे उभे करून हायकोर्टात याचिका दाखल केली, पण काही फायदा झाला नाही. तिथे त्याचे वडील त्याला नियमितपणे भेटायला यायचे. तेही काही वर्षांनी येणं बंद झालं. त्याला नंतर समजलं, आपले वडील गेले. भावाच्या निधनाच्या वेळी त्याने काही दिवस तुरुंगातून बाहेर सोडण्याची विनंती केली. पण त्याची फर्लो नाकारण्यात आली. वडिलांप्रमाणे त्याला भावाच्या अंत्यसंस्कारालाही जाता आलं नाही.
अखेर काहीतरी दैवाचीच चक्र फिरली. तुरुंग प्रशासनालाच विष्णूची केस लावून धरावी असं वाटलं आणि त्यांनी राज्याच्या कायदेविषयक सेवेला संपर्क केला. त्यांच्या मदतीने विष्णूची केस अलाहाबाद हायकोर्टात उभी राहिली. कोर्टाने पुन्हा सुनावणी घेत या प्रकरणी 28 जानेवारीला निकाल दिला. विष्णू तिवारी या प्रकरणात निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. ज्या स्त्रीवर बलात्कार झाला असा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तिने स्वतः केस दाखल केलीच नव्हती. तिच्या वतीने तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने तक्रार केली होती. यासंदर्भातली FIR सुद्धा तीन दिवसांनंतर दाखल करण्यात आली आणि त्यामध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या कुठल्याही जखमेच्या खुणा तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवर दिसल्याची नोंद नव्हती. इथेच शंका घ्यायला वाव होता. अखेर या गुन्ह्यामागचा उद्देशही कोर्टाच्या लक्षात आला. कुठल्यातरी जमीन आणि मालमत्तेप्रकरणी दोन गटांत वाद होता. त्यातूनच ही बलात्काराची खोटी तक्रार नोंदवण्यात आली होती. अखेर विष्णू तिवारीला दोन दशकांनी न्याय मिळाला.
हसऱ्या आयशाच्या आत्महत्येमुळे सारा देश हादरला, पोलिसांनी आवळल्या पतीच्या मुसक्या
या 20 वर्षांत विष्णूच्या कुटुंबातले सगळे सदस्य मृत्यू पावले. त्याला या जगात जवळचं असं कोणी नाही. उमेदीची वर्षं तुरुंगात गेली. तरी त्याने हार मानलेली नाही. तुरुंगात असताना तो कैद्यांचं जेवण तयार करायचा. स्वयंपाकात त्याचा हातखंडा होता. आता 43 व्या वर्षी सुटका झाल्यानंतर आपला ढाबा सुरू करण्याचं त्याच्या मनात आहे. लवकरच कागदपत्रांची पूर्तता होऊन विष्णूला मुक्त करण्यात येईल असं आग्रा मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक व्ही.के.सिंग यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Allahabad, Uttar pradesh