नवी दिल्ली, 7 डिसेंबर : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेणार आहेत. संजय राऊत यांच्या या भेटीवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत. शिवसेना (Shiv Sena) आता यूपीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. (Sanjay Raut said, Mahavikas Aghadi is experiment of mini UPA)
सजंय राऊत म्हणाले, काँग्रेस पक्ष राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सत्ता स्थापनेसाठी एकत्र आला. तिन्ही पक्षांचं मिळून उत्तम सरकार स्थापन सुरू आहे. तिन्ही पक्षांत संवाद असावा असं आम्हाला वाटतं आणि त्यानुसार मी दिल्लीत असलो आणि ते दिल्लीत असले तर आम्ही एकमेकांना भेटून चर्चा करतो. महाराष्ट्रातील राजकारण, सरकारचे कामकाज आणि एकंदरित देशातील भविष्यातील घडामोडींवर परिस्थितीवर चर्चा होते.
पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. त्यापैकी गोव्यात आम्ही निवडणुका लढवणार आहोत. उत्तरप्रदेशमध्ये निवडणुका लढवण्याच्या संदर्भात आम्ही चाचपणी करत आहोत. अशावेळी काँग्रेस पक्ष गोव्यात आणि उत्तरप्रदेशातही निवडणूक लढवत आहे. त्यानुसार, चर्चा झाली तर नक्कीच त्यावर चर्चा होईल असंही संजय राऊत म्हणाले.
वाचा : 'हाच मुद्दा मी मांडला होता', OBC Reservation रद्द मुद्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेना यूपीएचा भाग होणार?
शिवसेना यूपीएचा भाग होणार का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, हा प्रश्न आता तुम्ही कशासाठी विचारताय. त्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत भिन्न विचारांचे तीन पक्ष आहेत. महाराष्ट्रात जो प्रयोग सुरू आहे तो मिनी यूपीएचाच प्रयोग आहे.
आम्ही महाराष्ट्रात एकत्र आहोत. संसदेत लोकसभा किंवा राज्यसभेत काही निर्णय घेताना आम्ही सर्व एकत्र आहोत. गोव्यात गोमंतक पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने आघाडी स्थापन केली आहे. ज्याअर्थी शिवसेना त्यांच्या आघाडीत नाहीये त्याअर्थी शिवसेनेला त्या आघाडीत जायचं नाहीये. गोव्याच्या जनतेची मानसिकता आम्हाला चांगली माहिती आहे. गोवा आणि महाराष्ट्राचं एक खास नातं आहे. एकवेळ आम्ही स्वतंत्र लढू पण कोणत्या आघाडीसोबत जायचं याबाबत आम्ही 100 वेळा विचार करु असंही संजय राऊत म्हणाले.
वाचा : बुलढाण्यात वाघाची दहशत कायम; शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय
दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दुपारी 3.30 वाजता दिल्ली येथील राष्ट्रवादी कार्यालयात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून या बैठकीत पक्षातंर्गत होणार्या निवडणूका कार्यक्रम आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व विशेष निमंत्रित आणि कार्यकारिणी सदस्य जे मंत्री आहेत त्यांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान या बैठकीत युपीए किंवा ममता बॅनर्जी हा मुद्दा नसून फक्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi, Sanjay raut, Shiv sena