लिंगायत मठाधिपतीपदी प्रथमच मुस्लीम मुल्ला; बसवेश्वरांचे आहेत भक्त

लिंगायत मठाधिपतीपदी प्रथमच मुस्लीम मुल्ला; बसवेश्वरांचे आहेत भक्त

मठाधिपती म्हणून एखादी विवाहित आणि त्यातही मुस्लीम व्यक्ती यापूर्वी कधी नेमलेली नव्हती. कोरणेश्वर संस्थान शांतीधाम मठाच्या प्रमुखपदी दिवाण शरीफ रहिमतसाब मुल्ला यांची निवड झाली आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 20 फेब्रुवारी : लिंगायत मठाच्या प्रमुखपदी प्रथमच एका मुस्लीम व्यक्तीची नेमणूक झाली आहे. मठाधिपती म्हणून एखादी विवाहित आणि त्यातही मुस्लीम व्यक्ती यापूर्वी कधी नेमलेली नव्हती. कर्नाटकातल्या  गदगजवळच्या कोरणेश्वर संस्थान शांतीधाम मठाच्या प्रमुखपदी दिवाण शरीफ रहिमतसाब मुल्ला या 33 वर्षीय व्यक्तीची निवड झाली आहे.

लिंगायत समाज स्वामी बसवेश्वरांना मानणारा समाज आहे. दिवाण शरीफ मुल्ला हे मुस्लीम समाजात जन्माला आले असले, तरी त्यांचे आई-वडील बसवेश्वरांचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे मुल्लांच्या लहानपणापासूनच  लिंगायत धर्माचे संस्कार झाले.

कर्नाटकातल्या गदग जिल्ह्यात असणाऱ्या असुती मठाचे अधिपती म्हणून मुल्ला यांची निवड झाली आहे.  26 फेब्रुवारीपासून ते मठाधिपती म्हणून काम करतील. असुती मठ कलबुर्गीतल्या खजुरी गावातल्या कोरणेश्वर संस्थानशी संलग्न आहे. या कोरणेश्वर संस्थानला 350 वर्षांची परंपरा आहे. असुती मठ चित्रदुर्गच्या प्रसिद्ध श्री जगद्गुरू मुरुगराजेंद्र मठाशीसुद्धा संलग्न आहे.

"आमच्यासाठी धर्मतत्त्व महत्त्वाचं आहे. व्यक्ती नाही. आमच्या तत्त्वांनुसार आचरण असणारा कुणीही कुठल्याही जाती-धर्मात जन्माला आला असला, तरीफरक पडत नाही," खजुरी मठाचे पीठाधिपती मुरुगराजेंद्र कोरणेश्वर शिवयोगी यांनी दिवाण शरीफ मुल्लांच्या नेमणुकीबाबत अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्याच पुढाकाराने दिवाण शरीफ यांची नेमणूक आसुती मठाचे प्रमुख म्हणून झाली आहे.

लिंगायत समाजाच्या मठांचे स्वामी सर्वसाधारणपणे संन्यासी, ब्रह्मचारी म्हणजेच साधारणपणे अविवाहित असतात. पण दिवाण शरीफ हे विवाहित आहेत. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. 10 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी दीक्षा घेतली. त्याअगोदरपासून ते लिंगायत धर्माचा अभ्यास करत आहेत. "मला पवित्र बंधन बांधलं गेलं आणि या विश्वाची जबाबदारी दिली गेली. हा प्रवास खडतर होता. माझ्या आई-वडिलांनी स्वामी बसवेश्वरांना मुलगा अर्पण केला होता. मलासुद्धा आता त्याचप्रमाणे स्वामींच्या शिकवणीचा प्रसार करायचा आहे", असं दिवाण शरीफ म्हणतात.

मुस्लीम असले तर दिवाण यांचे पालक रहिमतसाब आणि आई फातिमा स्वामी बसवेश्वरांचे कट्टर भक्त होते. 10 व्या शतकातल्या या लिंगायत स्वामींनी एकात्मता, समानतेची तत्त्वांच्या प्रसारासाठी शिकवण दिली.

हेही वाचा -  तिरंग्यासाठी जीव टाकला धोक्यात, शिपायाच्या पराक्रमाला मुख्यमंत्र्यांचा सलाम

मठाधिपती म्हणून काम करण्याविषयी बोलताना शरीफ म्हणाले, "मी नेहमी माझ्या परमात्म्याचं ऐकतो. तीच माझी आत्मशक्ती आहे. माझी नेमणूक सर्वसंमतीने झाली. कुणीही माझ्या निवडीला आक्षेप घेतलेला नाही.  माझ्या मित्रांनी, सुहृदांनी आणि गुरूंनी मला नेहमी पाठिंबा दिला आहे. पूजापाठ किंवा इतर कल्याणकारी कामं करण्यासाठी मला आशीर्वाद दिले आहेत. मीसुद्धा पुढे जाऊन याच समानतेच्या आणि प्रेमळ भावनेनं काम करेन"

-----------------------

अन्य बातम्या

शरद पवारानंतर आता काँग्रेसही नाराज, उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर तीव्र आक्षेप

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’चा जागतिक स्तरावर नवा विक्रम, केली इतक्या कोटींची कमाई

First published: February 20, 2020, 2:00 PM IST
Tags: lingayat

ताज्या बातम्या