नवी दिल्ली,1 फेब्रुवारी : स्वातंत्र्यापूर्वी अनेक कारणांनी लाखो भारतीय परदेशांत स्थिरावले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर शिक्षणाच्या झालेल्या प्रसारामुळे देशातील शिक्षणाचा स्तर उंचावला. पण उच्च शिक्षणासाठी परदेशात जावं लागत होतं. आजही अनेक तरुण-तरुणी उच्च शिक्षणासाठी परदेशांत जातात. अशीच एक तरुणी वयाच्या 20 व्या वर्षी शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेत गेली. आपलं बुद्धिकौशल्य आणि कर्तृत्वाच्या बळावर तिने अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (NASA) काम केलं. नासाच्या कोलंबिया या यानातून अंतराळात जाण्याचा मान कल्पना चावलाला मिळाला. अंतराळात जाणारी कल्पना ही पहिली भारतीय वंशाची अमेरिकी महिला ठरली. 17 मार्च 1962 ला हरियाणातील करनालमध्ये जन्मलेल्या कल्पना चावलाने भारताचं नाव अजरामर केलं. वयाच्या 20 व्या वर्षी ती मार्स्टर ऑफ सायन्स एरोस्पेस इंजिनीअरिंग हे शिक्षण घ्यायला कल्पना अमेरिकेत गेली होती. दोन वर्षांत तिनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. ती ज्या कोलंबिया अंतराळयानातून गेली होती ते 1 फेब्रुवारी 2003 ला पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना त्याचा स्फोट झाला आणि यानातील सातही जणांचा मृत्यु झाला. त्यात कल्पनालाचाही मृत्यु झाला. आज त्यांचा 18 वा स्मृतिदिन आहे. नासाकडून एका सुपर कॉम्प्युटरला दिलं कल्पनाचं नाव - दिवंगत अंतराळवीर कल्पना चावलाच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी 12 मे 2004 ला नासाने एका सुपर कॉम्प्युटरला तिचं नाव दिलं. ECCO फ्रेमवर्कमधील हाय-रिझोल्युशन ओशन अनॅलिसिस करण्याचं काम SGI Altix 300 supercomputer करतो. त्याला कल्पना चावलाचं नाव देण्यात आलं.
(वाचा - Budget 2021: अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकून नितीन गडकरींना आठवले कॉलेजची स्कूटर )
झिऑन नॅशनल पार्कमध्ये झाले अंत्यसंस्कार - कल्पना चावला एका महत्त्वाच्या मिशनमधून परतताना जगाचा निरोप घेऊन गेली. पण तिने मृत्युपूर्वीच इच्छा लिहून ठेवली होती. त्याप्रमाणे तिच्या मृतदेहावर अमेरिकेतल्या उताहमधील झिऑन नॅशनल पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तिच्या इच्छेनुसार तिच्या अस्थि या पार्कमध्ये विखुरण्यात आल्या. पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी - कल्पनाला लहानपणापासूनच विज्ञानाबद्दल आकर्षण होतं. तिने पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. या विषयातील अधिक अभ्यास करण्याची तिला इच्छा होती. त्यामुळे तिने अमेरिकेत शिक्षण घ्यायला जाण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 20 व्या वर्षी ती मार्स्टर ऑफ सायन्स एरोस्पेस इंजिनीअरिंग हे शिक्षण घ्यायला कल्पना अमेरिकेत गेली होती. दोन वर्षांत तिने हा अभ्यासक्रम पूर्ण केला. शाळेत असताना कल्पनाला कविता आणि नृत्य करण्यात खूपच रस होता. तिला लहानपणापासूनच विमानं आणि आकाशातल्या उड्डाणाबद्दल प्रचंड आकर्षण होतं. त्यामुळे आपल्या वडिलांबरोबर ती स्थानिक फ्लाइंग क्लबमध्येही जायची. (हे देखील वाचा - Budget 2021: सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबत अर्थमंत्र्यांची घोषणा; SEBI ठेवणार व्यवहारावर लक्ष ) विद्यापीठं, स्कॉलरशीपना कल्पनाचं नाव 40 व्या वर्षी नासाच्या मोहिमेत मरण पावलेल्या कल्पनाला मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ऑनर देऊन गौरवण्यात आलं आणि अमेरिकेतील अनेक रस्ते, विद्यापीठं आणि संस्थांना तिचं नाव देण्यात आलं. तिच्या नावाने अनेक स्कॉलरशीपही सुरू झाल्या. अमेरिकेतील एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी नॉर्थरोप ग्रुमन कंपनीने नव्या अंतराळयानाला कल्पना चावलाचं नाव दिलं आहे.