नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : अनेक व्यक्ती अशा असतात, की त्यांचं त्यांच्या वाहनांशीही अतूट नातं असतं. कोणाची वाहन घेतल्यावर भरभराट झालेली असते, कोणाच्या आयुष्यात ते वाहन घेतल्यावर काही सुखद घटना घडलेल्या असतात, तर कोणाला त्या वाहनातून केलेल्या प्रवासातून अतीव आनंद मिळालेला असतो. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्या वाहनाशी ऋणानुबंध जुळतात. आपल्याकडच्या मोटार वाहन कायद्यानुसार 15 वर्षांनी गाडीची पुन्हा नोंदणी करावी लागते. तेव्हा ती गाडी व्यवस्थित असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असली, तरच तिची पुन्हा नोंदणी होऊ शकते; पण गाडी व्यवस्थित नसल्याने पुन्हा नोंदणी होऊ शकली नाही अशी अडचण वर उल्लेख केलेल्या वाहनप्रेमी व्यक्तींच्या बाबतीत येतच नाही. कारण ते गाडीला इतकं जिवापाड जपतात, की जणू काही तो कुटुंबातलाच एखादा हाडामांसाचा माणूस असावा. कोणे एके काळी अभिनेते असलेले आणि आता गेली बरीच वर्षं राजकीय नेते असलेले केरळमधले (Kerala) आमदार के. बी. गणेश कुमार (K. B. Ganesh Kumar) हे त्यापैकीच एक.
त्यांनी 2000 साली घेतलेली टोयोटा क्वालिस (Toyota Qualis) ते आजही नियमित वापरतात आणि त्यांनी तिला अगदी उत्तम स्थितीत राखलं आहे. दरम्यानच्या काळात टोयोटा कंपनीने क्वालिस गाड्यांचं उत्पादनही बंद केलं; पण गणेश कुमार मात्र क्वालिसच मोठ्या अभिमानाने आजही वापरत आहेत. 'कारटॉक डॉट कॉम'ने गणेश कुमार यांच्या क्वालिसप्रेमाची गोष्ट प्रसिद्ध केली आहे.
क्वालिस ही टोयोटाकडून (Toyota) भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेली पहिली गाडी होती. ती एमपीव्ही (MPV) अर्थात मल्टिपर्पज व्हेइकल म्हणून ओळखली जायची. पेट्रोल आणि डिझेल इंजिन अशा दोन्ही प्रकारांत ती उपलब्ध होती. पेट्रोल इंजिन 2.0 लिटरचं, डिझेल इंजिन 2.4 लिटरचं होतं. दोन्ही प्रकारच्या गाड्यांत पाच गिअर होते. दणकट बांधणी आणि आरामदायी प्रवासासह अनेक वैशिष्ट्यांमुळे क्वालिस अनेकांच्या पसंतीस उतरली. तेव्हा क्वालिस बेस्ट सेलिंग एमपीव्ही (Best Selling MPV) ठरली होती. शेवरोलेच्या तवेरापुढे तिने तगडं आव्हान उभं केलं. एवढंच नव्हे, तर आपल्याच कंपनीच्या इनोव्हाशीही तिने स्पर्धा केली. क्वालिसनंतर टोयोटाने इनोव्हा बाजारात आणली.
एक काळ असा होता, की क्वालिस आणि इनोव्हा (Innova) या दोन्ही गाड्या उपलब्ध होत्या; मात्र क्वालिसमुळे इनोव्हाच्या विक्रीवर परिणाम होत असल्याचं लक्षात आल्याने टोयोटाने क्वालिसचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला. नंतर इनोव्हा पुढे आली आणि सध्याच्या घडीला इनोव्हा क्रिस्टा ही भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एमपीव्हीपैकी एक आहे. असं असलं, तरी आजही एखाद-दुसरी क्वालिस रस्त्यावर हमखास नजरेस पडते, ती तिच्या या वैशिष्ट्यांमुळेच.
सध्या केरळमधल्या कोळ्ळम (Kollam) इथल्या पठाणपुरम मतदारसंघाचे आमदार असलेले के. बी. गणेश कुमार यांनी 2000 साली ते अभिनय क्षेत्रात असताना क्वालिस घेतली होती. आपल्या एका मित्राच्या क्वालिसमध्ये बसल्यानंतर त्यांना त्या गाडीतला प्रवास खूपच आरामदायी असल्याचं जाणवलं आणि त्यांनी स्वतःदेखील क्वालिस खरेदी केली. ती निळ्या रंगाची असल्याने कोणीही ती गाडी गणेश कुमार यांची असल्याचं पटकन ओळखायचं. नंतर त्यांनी अभिनेतेपदाकडून नेतेपदाकडे प्रवास केला. त्या प्रवासातही क्वालिसची साथ सुटली नाही. आता तर त्या गाडीची ओळख इतकी तयार झाली आहे, की त्यांच्या गाडीवर आता 'आमदार' अशी पाटीही नसली, तर लोकांना ती कोणाची गाडी आहे हे बरोबर माहिती आहे.
वाचा : आता पाण्याच्या इंधनावर चालणार गाड्या; पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीत मोठा दिलासा
गणेश कुमार यांचं त्यांच्या वाहनांसोबत आणि खासकरून या निळ्या क्वालिससोबत खास नातं तयार झालं आहे. गेल्या चार निवडणुकांच्या वेळी प्रचार आणि अन्य संबंधित सगळ्या कामांसाठी याच गाडीचा वापर त्यांनी केला आहे. या गाडीने बरीच सुख-दुःखं पाहिली आहेत आणि कोणी कितीही किंमत देऊ केली तरी ती आपल्याला विकायची नाही, असं गणेश कुमार सांगतात.
योग्य वेळेला सर्व्हिसिंग आणि मेन्टेनन्स राखल्यामुळे गणेश कुमार यांची क्वालिस 21 वर्षं होऊनही उत्तम स्थितीत आहे. ती अजूनही दररोज वापरली जाते. क्वालिसची किंमत 6-7 लाख रुपयेच होती; मात्र कोणे एके काळी त्यांचे विरोधक ते 20-25 लाखांची गाडी वापरत असल्याचे दावे करत असत. गाडी किती 'रिच' वाटायची, याचं हे एक उदाहरण. ती गाडी गणेश कुमार यांनी आजही तशीच 'रिच' राखली आहे. त्यांच्या गाडीवरच्या प्रेमाची यापेक्षा वेगळी साक्ष देण्याची काही गरज नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.