भोपाळ, 17 जानेवारी : मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये या वर्षी (2023) विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षानं (भाजप) दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आयाजित केली आहे. सोमवारपासून (16 जानेवारी) राजधानी दिल्लीमध्ये ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत मध्य प्रदेशसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीबाबत पक्ष आपली रणनीती आखणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील सहा विद्यमान केंद्रीय मंत्र्यांपैकी एकाला महत्त्वाच्या जबाबदारीसह मध्य प्रदेशात परत पाठवलं जाऊ शकतं. या शर्यतीत तीन केंद्रीय मंत्र्यांची नावं आघाडीवर आहेत.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसोबतच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळासह राज्यातील पक्ष संघटनेतही मोठ्या फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारही याच महिन्यात होण्याची शक्यता आहे.
(निवडणूक आयोग आणि शिंदे गटाची साठ गाठ झाली आहे का?, सुषमा अंधारेंची शिंदे गटावर टीका)
मध्य प्रदेशातील सध्याच्या एका मंत्र्याला मोठी भूमिका देऊन राज्यातील आणखी दोन नेत्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. मध्य प्रदेशातील बदलांच्या चर्चांदरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे की, मी पक्षातील माझी भूमिका स्वत: ठरवू शकत नाही. मी पक्षाचा समर्पित कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षानं अगदी मला चटया टाकण्याचं काम दिलं तरी मी ते करण्यास तयार आहे.
'या' नेत्यांची नावं आहेत चर्चेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातून ज्या नेत्यांना मध्य प्रदेशात परत पाठवलं जाऊ शकतं, त्यात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर, अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद पटेल आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावांचा समावेश आहे. भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मंत्र्यांना राज्यात परत पाठवलं जाऊ शकतं, त्यात नरेंद्रसिंह तोमर यांचं नाव आघाडीवर आहे. तोमर यांना पक्ष संघटनेचा सर्वाधिक पाठिंबा आहे. तर, शिंदे आणि पटेलही त्यांना जोरदार टक्कर देत आहेत. या तिघांशिवाय कैलाश विजयवर्गीय यांच्याही नावाची चर्चा आहे.
हेही वाचा - वंचितला मविआमध्ये येण्याचा मार्ग मोकळा, अजितदादांनी सांगितला फॉर्म्युला
ओबीसी नेता असल्यामुळे प्रल्हाद पटेल शिंदेंना मागे टाकू शकतात. मात्र, मध्य प्रदेश भाजप युनिटमध्ये गटबाजी असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व सर्व पैलू लक्षात घेऊनच शेवटचा निर्णय देतील. मुख्यमंत्री चौहान यांच्यानंतर नरेंद्रसिंह तोमर हे पक्षातील एकमेव ज्येष्ठ नेते आहेत ज्यांना सर्व गटांकडून पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे, पक्षश्रेष्ठी त्यांना कोणती जबाबदारी देतील, याबाबत उत्सुकता आहे.
नरोत्तम मिश्रा यांच्याबाबत नाराजी
काही महिन्यांपूर्वीपर्यंत राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे मुख्यमंत्रिपदासाठी शिवराज सिंह चौहान यांच्याऐवजी उत्तम पर्याय होते, असा दावा सूत्रांनी केला आहे. पण, स्पष्टवक्तेपणा आणि ज्योतिरादित्य शिंदेंच्या निष्ठावंत माजी मंत्री इमरती देवी यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व मिश्रा यांच्यावर नाराज आहे. याशिवाय, कैलाश विजयवर्गीय हेदेखील प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झाले आहेत.
आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नेहमीच धक्कादायक आणि आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेतला जाऊ शकतो, असं मानलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Jyotiraditya scindia, Madhya pradesh, भाजप, मध्यप्रदेश