अहमदाबाद, 27 जानेवारी: भारतीय नौदलातून (Indian Navy) निवृत्त झाल्यानंतर आयएनएस विराट (INS Virat) ही युद्धनौका तोडण्यासाठी विकण्यात आली असून, तोडण्याचं 30 टक्के काम पूर्ण झालं आहे. गुजरातमध्ये जी कंपनी ही युद्धनौका तोडण्याचं काम करत आहे, तिच्या म्हणण्यानुसार हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी नऊ महिने लागणार आहेत. गेल्या वर्षी श्रीराम ग्रुपने (Shriram Group) ही युद्धनौका 38.54 कोटी रुपयांना खरेदी केली होती आणि त्यानंतर डिसेंबरपासून गुजरातमधील भावनगर इथल्या अलंग शिपयार्डमध्ये (Alang Shipyard) ती तोडण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. जगात सर्वाधिक काळ युद्धनौका म्हणून सेवा देण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. 1987मध्ये भारतीय नौदलात दाखल झालेल्या आयएनएस विराटला मार्च 2017मध्ये सेवामुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर सप्टेंबरमध्ये या युद्धनौकेने मुंबईतून अलंग शिपयार्डपर्यंतचा अखेरचा प्रवास केला होता. तिथे ही युद्धनौका तोडण्याचं काम सुरू आहे. तोडण्याचं काम कसं सुरू आहे? श्रीराम ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, विराट युद्धनौका तोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील इको-फ्रेंडली (Eco Friendly) पद्धतींचा वापर केला जात आहे. नौदलाच्या शिफारशीनंतरच विराट नौका भंगारात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असं केंद्र सरकारने संसदेत सांगितलं होतं. विराट तोडण्याचं काम किनाऱ्यापासून तीनशे मीटर अंतरावर सुरू आहे.
जे 30 टक्के काम आतापर्यंत झालं आहे, त्यासाठी गॅस कटर्स आणि क्रेन्सची मदत घेण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर तोडकाम झाल्यानंतर आणखी तोडकामासाठी विराटला किनाऱ्यापासून आणखी दूर नेलं जाईल. या प्रक्रियेत सुरुवातीला स्की जम्प तोडण्यात आलं. युद्धनौका तोडण्याचं काम अशा पद्धतीने केलं जात आहे, की तिचं संतुलन कायम राहील आणि ती पाण्यात तरंगत राहील. नौका पाठीमागून तोडण्यात आल्यानंतर मधल्या भागातला धातू काढण्यात आला आहे. किती वेळ लागणार? ही युद्धनौका पूर्णपणे तोडण्यासाठी श्रीराम ग्रुपला आणखी आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. महिन्याभरात तीस टक्के तोडकाम करून नौका हलकी करण्यात आली आहे. आणखी वजन कमी झालं, की नौकेला ओढणं सोपं होईल. त्यानंतर सर्व भाग पूर्णतः सुटे करण्यासाठी नौका यार्डात आणली जाऊ शकेल. विराटमध्ये वापरण्यात आलेला किती धातू वाचवता येऊ शकेल, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. विराटला भंगार कंपनीच्या हवाली करण्याआधी नौदलाने त्या युद्धनौकेच्या स्मृती जपण्यासाठी स्टीअरिंग व्हीलसारखे काही भाग काढून घेतले होते; मात्र इंजिन, प्रोपेलर, शाफ्ट असे भाग काढण्यात आलेले नाहीत. किती लोक?
आयएनएस विक्रांत युद्धनौका मुंबईत 2014 साली तोडण्यात आली होती. त्यानंतर सहा वर्षांनी विराटला तोडण्याचं काम सुरू झालं आहे. कारागिरांपासून विशेषज्ञांपर्यंत असे सुमार 300 प्रशिक्षित कामगार हे काम करत आहेत. घातक मटेरियल बाजूला काढण्याच्या कामासाठी याआधी एक विशेष टीम आणण्यात आली होती. पुन्हा गरज लागल्यासही त्या टीमला आणलं जाईल. 1940च्या दशकात आयएनएस विराटच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. ही युद्धनौका तोडताना त्यातून ओझोनला नुकसान पोहोचवणाऱ्या वायूंसह काही घातक धातू आणि वायू असण्याची शक्यता होती. त्यामुळे विशेष HAZMAT टीम त्या कामासाठी आणण्यात आली होती. युद्धनौका तोडण्याच्या कामात अत्यंत सावधगिरी बाळगली जात आहे, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये आणि घातक मटेरियल योग्य पद्धतीने काढलं जाईल.
हे देखील वाचा - फेब्रुवारीपासून बिनधास्त प्रवास करा; मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
सगळं तोडकाम झाल्यानंतर श्रीराम ग्रुपला जे भाग मिळतील, ते कंपनी एक तर विकून त्यापासून नफा कमावील. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी उत्पादनासाठी त्यांचा वापर करणं. विराट युद्धनौकेत वापरलेला धातू आणि स्टीलचा वापर करण्यासाठी काही ऑटोमोबाइल कंपन्यांनी आधीच उत्सुकता दर्शविली आहे.