कोरोनानंतर आता भारतासमोर भूकबळीचं संकट; बांगलादेश, पाकिस्तान, भूतानपेक्षाही परिस्थिती गंभीर

कोरोनानंतर आता भारतासमोर भूकबळीचं संकट;  बांगलादेश, पाकिस्तान, भूतानपेक्षाही परिस्थिती गंभीर

Right to Food Campaignचे भारतातील सदस्य सचिन कुमार जैन यांनी भारत सरकार बालमृत्यूदर आणि कुपोषण रोखण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचे देखील म्हटले आहे

  • Share this:

सुहान मुन्शी, नवी दिल्ली, 18 ऑक्टबर : वर्ल्ड हंगर इंडेक्स (World Hunger Index) जाहीर झाली असून असून 107 देशांच्या यादीत भारत 94व्या स्थानावर आला आहे. शेजारील देश असणाऱ्या श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमारपेक्षा भारताची अवस्था वाईट आहे. भारतात मोठ्या प्रमाणात गरिबी वाढल्याचे चित्र यानंतर स्पष्ट होत आहे. या अहवालामध्ये श्रीलंका 64व्या, नेपाळ 73व्या, बांगलादेश 75व्या आणि पाकिस्तान 88व्या क्रमांकावर आहे.

107 देशाच्या या यादीमध्ये भारत केवळ 13 देशांच्या आधी आहे. भारताच्या खालोखाल उत्तर कोरिया, रवांडा, हैती, अफगाणिस्तान आणि सीरिया लेओन या देशांचा समावेश आहे. 94व्या क्रमाकांवर असलेल्या भारताला या इंडेक्समध्ये 27.2 इतके गुणांकन मिळाले असून भूकबळींची समस्या भारतात गंभीर आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. Welthungerhilfe and Concern Worldwide ने शुक्रवारी ही यादी जाहीर केली आहे.

रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये कोरोनाचा खूप मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात भारतात तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊन होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या संख्येने भूकमारीला तोंड द्यावे लागले होते. अहवालानुसार, कोव्हिड-19 चा परिणाम झाल्यामुळे बर्‍याच जणांच्या अन्न आणि पोषण सुरक्षिततेचे नुकसान झाले. कोव्हिड-19 चे उपासमारीवर होणारे दुष्परिणाम भविष्यात बदलण्याची शक्यता असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सध्याच्या अहवालात भूक आणि कुपोषणावर कोरोना व्हायरसचा किती परिणाम झालेला आहे हे दाखवणारा नाही, असेही म्हटले आहे. या सगळ्याचा या आकडेवारीवर परिणाम झाला असून वाढत्या गरिबीमुळे देखील भारत या यादीमध्ये घसरला आहे.

(हे वाचा-या सरकारी कंपनीची मोठी घोषणा,दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार 68500 रुपये)

भारताचे अन्न हक्क मोहीमेचे सदस्य (Right to Food Campaign) सचिन कुमार जैन यांनी भारत सरकार बालमृत्यूदर आणि कुपोषण रोखण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचे देखील म्हटले आहे. सरकारने कुपोषणाच्या मुद्द्यावर लक्ष द्यायला हवे असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर ज्या देशांच्या यादीत जास्त बालमृत्यूदर आहे त्या 11 देशांमध्ये  भारत 'Very High' कॅटेगरीमध्ये येत असून 17.3% बालमृत्यूदर भारताचा आहे.

असा काढतात हंगर इंडेक्स

भारतामध्ये हंगर इंडेक्सचा अभ्यास करताना प्रामुख्याने देशातील कुपोषित लोकसंख्येची टक्केवारी, पाच वर्षांखालील मुलांची खुंटलेली वाढ, पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूदर या तीन घटकांवर विचार करण्यात आलेला आहे. मत्री सुधा या एनजीओमधील आरोग्य आणि पोषणासंबंधी सल्लागार अरविंद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,बालकं दोन वर्षांची झाल्यानंतर कुपोषणाला सुरुवात होते. या वयामधील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषण आढळून येतं. महिलांच्या गर्भारपणाच्या आधीपासून मूल दोन वर्षांचं होईपर्यंत सर्वसमावेशक पोषण होईल अशी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. तरच या समस्येशी लढता येईल.

(हे वाचा-SBI अलर्ट! अजिबात करू नका या 5 चुका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे)

या अभ्यासात असं दिसून आलं आहे की 5 वर्षांहून लहान मुलांच्या मृत्युंचं प्रमाण, अर्भकांना होणार इन्फेक्शन, न्युमोनिया, डायरिया, प्रीमॅच्युरिटीमुळे मुलांचा मृत्यु होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तसंच 1991 ते 2014 च्या डाटाचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं आहे की भारत, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये गरिबी, अशिक्षित पालक, आहारातील वैविध्य या कारणांमुळे मुलांची उपासमार वाढली आहे.

दरम्यान, देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते 100 गुण दिले जातात. यामध्ये 0 गुण हे सर्वोत्तम समजले जातात. त्याचा अर्थ देशात भुकेची स्थिती नाही, असा होतो. तर 10 पेक्षा कमी गुण असणे म्हणजे त्या देशात भुकेची स्थिती फारशी गंभीर नाही असा अर्थ होतो. तर 20 ते 34.9 गुण भुकेचे गंभीर संकट दर्शवतात. 35 ते 49.9 गुण परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे दर्शवतात. तर 50 किंवा त्यापेक्षा अधिक गुण हे भुकेची परिस्थिती भयावह असल्याचे दर्शवतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 18, 2020, 9:36 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading