नवी दिल्ली, 16 जून : भारत-चीन सीमेवर काल रात्री अचानक उडालेल्या चकमकींमध्ये दोन्ही बाजूंच्या सैनिकांचे प्राण गेले आहेत. लष्कराने दुपारी या वृत्ताची पुष्टी केली. त्यानंतर आता केंद्र सरकारडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने या संबंधी निवेदन दिलं आहे.
भारत आणि चीन (India-China) दरम्यान लडाख सीमेवर अचानक तणाव वाढला आणि चकमकीत आपल्या बाजूचे दोन जवान आणि कर्नल शहीद झाले. पूर्व लडाख (Eastern Ladakh) जवळच्या सीमा रेषेवर गेल्या महिनाभरापासून संघर्ष सुरू आहे. पण त्यावर चर्चेअंती सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतरही काल रात्री दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये तुंबळ चकमक झाली. या सगळ्यावर औपचारिक प्रतिक्रिया आणि निवेदन परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.
Given its responsible approach to border management, India is very clear that all its activities are always within the Indian side of the LAC. We expect the same of the Chinese side: Ministry of External Affairs https://t.co/1ad3Z7q0aR
'15 जूनला संध्याकाळी आणि रात्री उशिरा चीनकडून आहे ती परिस्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न झाला. त्यातून दोन्ही सैन्याचा हिंसक सामना झाला. दोन्ही देशांचं यात नुकसान झालं. हे नुकसान वाचवता आलं असतं.
सीमाप्रश्नी जबाबदार दृष्टिकोन भारताने नेहमीच ठेवलेला आहे. त्यामुळे भारतीय सैन्याची कुठलीही कारवाई ही प्रत्यक्ष ताबारेषेच्या (LAC) भारतीय बाजूच्या हद्दीतच झालेली आहे. आम्हाला चीनकडूनही तशीच अपेक्षा आहे.
सीमा क्षेत्रात शांतता राखण्याचा भारताचा प्रयत्न पहिल्यापासून आहे. आपसांतील वादांवर संवादाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, यावर आमचा विश्वास आहे. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत', असं या निवेदनात म्हटलं आहे.
सीमाभागात तणाव नवा नाही. पण दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये अशा प्रकारे हिंसा 45 वर्षांनंतर झाली आहे. यावेळी सैनिकांमध्ये गोळीबार नाही तर दगडफेक झाली, असंही वृत्त आहे.