भारत चीन : दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची संघर्षानंतर प्रथमच फोनवर चर्चा

भारत चीन : दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची संघर्षानंतर प्रथमच फोनवर चर्चा

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे वांग यी यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याचं समजतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : भारत-चीन सीमेवर असलेल्या तणावाच्या प्रश्नाबद्दल दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा झाली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे वांग यी यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याचं समजतं. मंगळवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात सीमेजवळ दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला. यामध्ये दोन्ही बाजूंचं नुकसान झाल्याची भारताने माहिती दिली आहे. चीनने याबाबत अजूनही अधिकृत भूमिका किंवा किती सैनिक मारले गेले याविषयी माहिती दिलेली नाही.

सीमा परिस्थिती चिघळल्यानंतर प्रथमच या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये संवाद झाला आहे.

दरम्यान भारत-चीन संघर्षाची अमेरिकेबरोबरच युरोपीय महासंघाने (European Union)दखल घेतली आहे. आम्ही दोन्ही बाजूंना सैन्य मागे घ्यायची विनंती करतो. शांततामय मार्गाने यावर तोडगा काढावा, असं आवाहन करतो, असं युरोपीयन युनियनने म्हटलं आहे.

भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. लडाख भागातील पेगॉंग त्सो जवळ 5 मे पासून तणावाची परिस्थिती आहे. सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारात चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर भारताचे 20 जवान शहीद झाल्याची अधिकृत माहिती आहे. भारताचे आणखी 80 जवान जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

गलवान खोऱ्यातली परिस्थिती नियंत्रणात आहे. सीमेवरचं सैन्य तणाव निवळण्याचा प्रयत्न करत आहे, हे एवढंच सांगताना चीनने संघर्षाला आम्ही जबाबदार नसल्याचं सांगत हात झटकले आहेत. मात्र त्याच वेळी चीनच्या बाजूचं किती नुकसान झालं, 43 सैनिक मृत्युमुखी पडले का याबाबत मात्र मौन बाळगलं आहे.

भारताच्या परराष्ट्र खात्याने दोन देशांच्या लडाखजवळच्या सीमाभागात संघर्ष झाल्याचं निवेदन दिलं होतं. त्यात दोन्ही बाजूंकडचं नुकसान झाल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर भारतीय लष्कराने यात धारातीर्थी पडलेल्या 20 जवानांची नावंसुद्धा जाहीर केली. मात्र चीनच्या बाजूने अद्यापही यावर अधिकृत काही माहिती जाहीर झालेली नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 43 चिनी सैनिकांच्या मृत्यूच्या बातमीबद्दल बोलायला नकार दिला. "सीमेवरचं सैन्य हे प्रकरण हाताळत आहे", एवढंच त्यांनी सांगितलं. भारताने 20 सैनिक शहीद झाल्याचं जाहीर केलं आहे, मग बीजिंग त्यांचं किती नुकसान झालं हे का लपवत आहे, असं वारंवार विचारल्यावर झाओ लिजियान म्हणाले, "मी आत्ता या विषयावर बोलणार नाही. चीन आणि भारताचे सैनिक एकत्रितरीत्या हे प्रकरण हाताळत आहे आणि माझ्याकडे आणखी सांगण्यासारखं काही नाही."

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, पंतप्रधान मोदींनी चीन वादावर सोडलं मौन

ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारत-चीन संघर्षाबद्दल बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी, 'सीमेवर जे झालं ते प्रत्यक्ष ताबारेषेच्या (LAC ) चीनच्या बाजूला झालं. त्यामुळे अर्थातच या संघर्षासाठी चीन जबाबदार नाही', असं सांगितलं आहे.

भारतीय सैन्याने शिस्तीत ताबारेषेच्या आत राहावं, असा इशाराही चिनी परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्याचं ग्लोबल टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

दुसरीकडे अमेरिकेने भारत- चीन सीमेवरच्या घडामोडींवर आमचीही नजर असल्याचं निवेदन दिलं आहे. आम्हाला आशा आहे की, सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा काढला जाईल, असं अमेरिकेने म्हटलं आहे.

संकलन - अरुंधती

अन्य बातम्या

घरात लग्नाची तयारी होती सुरू; त्यापूर्वीच चीनविरोधात लढताना जवानाला आलं वीरमरण

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

First published: June 17, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या