नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: प्रजासत्ताक दिनी
(Republic day) कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली येथे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान जो हिंसाचार घडला त्या आरोपाखाली दिल्ली पोलीस, गँगस्टर लक्खा सिंग सिधानाचा शोध घेत आहेत. मात्र दिल्ली पोलिसांना यात अजूनही यश मिळू शकलेलं नाही. दरम्यान फरार लक्खा सिंग सिधानाने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने एकीकडे शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे, तर दुसरीकडे 23 फेब्रुवारीला अजून एका मोर्चाची घोषणा केली आहे. या मोर्चाचं आयोजन भटिंडामध्ये करण्यात येणार आहे असं सांगितलं गेलंय. तसंच या व्हिडीओमधून पंजाबच्या लाखो युवा तरुणांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय.
26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली दरम्यान जी हिंसा भडकली होती त्या आरोपाखाली पोलीस 25 दिवसांपासून लक्खा सिंग सिधानाचा शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांकडून लक्खा सिंगला पकडून देण्यास मदत करणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केलं आहे. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर, रात्रीच्या अंधारात लक्खा सिंगने एका तंबूत हा व्हिडीओ बनवला असल्याचं समजतं आहे. शेजारी बरेच लोक झोपलेलेही या व्हिडीओत दिसत आहेत.
(वाचा - साताऱ्यातील पावसात झालेल्या 'त्या' सभेचं गुपित आलं समोर; सुप्रिया सुळेंनी केला मोठा खुलासा)
लक्खा सिंग सिधाना कोण आहे?
लक्खा सिंग सिधाना हा पंजाबमधल्या भटिंडा येथे राहतो. 26 नोव्हेंबर, 2020 पासून तो सिंधु बॉर्डरवर कृषी आंदोलनात सहभागी झाला होता. सिधानावर पंजाबमध्ये अनेक फौजदारी खटले दाखल आहेत आणि अनेकदा त्याने तुरुंगाची हवा देखील खाल्ली आहे. सिधानाने यापूर्वीही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ प्रसिद्ध केले असून त्यात त्याने गुन्हेगारी जग सोडलं असल्याचा दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तो आता सामाजिक कार्यात व्यस्त आहे. 2012 मध्ये पीपल्स पार्टी ऑफ पंजाबच्या चिन्हावर त्याने विधानसभा निवडणूकदेखील लढवली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.